अन लघु नळ योजनेच्या बांधकाम चोरीला गेला!

इटान येथील प्रकार

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
लाखांदूर,
Itan Gram Panchayat : लाखांदूर तालुक्यातील इटान ग्रामपंचायतीच्या लघु नळ पाणीपुरवठा योजनेत मोठा घोळ उघडकीस आला आहे. गावकऱ्यांना तात्काळ पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी म्हणून पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी यांनी सौरऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेचे काम एका कंत्राटदाराला दिले होते. त्या कंत्राटदाराने बांधकाम पूर्णही केले. मात्र, आठ महिन्यांनंतर त्याला धक्का बसला — कारण ज्याने प्रत्यक्ष काम केलेच नाही, अशा दुसऱ्या कंत्राटदाराला देयके देण्यात आली होती.
 
 
 
ITAN
 
 

प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणात पंचायत विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून पंचायत समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या एजन्सीच्या नावे केवळ २५ दिवसांत देयके काढल्याचा आरोप आहे. मूळ काम करणाऱ्या कंत्राटदाराने सभापती पुरुषोत्तम ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीत इटान गावातील जुन्या वस्तीतील बाजार चौक आणि ग्रामपंचायत समोरील वस्तीत लघु नळ योजनेचे कार्य पूर्ण व सुरू असल्याचे स्पष्ट दिसले.

 

सभापती ठाकरे म्हणाले, “या प्रकरणात अनियमितता दिसून येत असून चौकशीचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.” विस्तार अधिकारी श्री. डांगरे यांनी सांगितले की, “काम करणाऱ्या ठेकेदाराने देयकांसाठी कागदपत्रे सादर केली नव्हती, त्यामुळे दुसऱ्याची देयके काढण्यात आली. आता चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे.”

 

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष श्रीकांत रणदिवे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामसेवक पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.

 

या घोळामुळे इटान ग्रामातील नागरिकांत संताप असून “प्रत्यक्ष काम करणाऱ्याचे हक्काचे पैसे दुसऱ्याला देणे” हा प्रकार पंचायत प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे.