मुंबई,
Lalpari's earnings during Diwali राज्य परिवहन महामंडळासाठी यंदाची दिवाळी ‘सुवर्णदिवाळी’ ठरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तोट्याचा सामना करणाऱ्या लालपरीला दिवाळीच्या १० दिवसांच्या हंगामात तब्बल ₹३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती देत आनंद व्यक्त केला असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांचे विशेष अभिनंदन केले आहे. दिवाळी हंगामात १८ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत एसटी महामंडळाने दररोज सरासरी ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. विशेष म्हणजे, २७ ऑक्टोबर या परतीच्या दिवशी एसटीने उत्पन्नाचा नवा विक्रम केला. एका दिवसात तब्बल ₹३९ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा ठरला.
राज्यातील सर्व ३१ विभागांमध्ये पुणे विभागाने सर्वाधिक ₹२० कोटी ४७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून आघाडी घेतली. त्यानंतर धुळे विभागाने ₹१५ कोटी ६० लाख आणि नाशिक विभागाने ₹१५ कोटी ४१ लाख रुपयांचे उत्पन्न नोंदवले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महामंडळाला तब्बल ₹३७ कोटींनी अधिक उत्पन्न मिळाले आहे. सरनाईक यांनी सांगितले की, दिवाळीच्या काळात वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे आणि सुट्ट्यांमुळे एसटीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे, बीड, अमरावती, बुलढाणा या विभागांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.
तथापि, काही विभागांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि धाराशिव या विभागांनी अत्यंत सुमार उत्पन्न नोंदवले आहे. त्यामुळे महामंडळाच्या एकूण लक्षावर विपरीत परिणाम झाला असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. महामंडळाला एप्रिल आणि मे वगळता मागील काही महिन्यांत मोठा तोटा सहन करावा लागला होता. अवकाळी पाऊस, पूरस्थिती आणि इंधनखर्च वाढ यामुळे जून ते सप्टेंबरदरम्यान एसटीला ₹१५० कोटींपेक्षा जास्त तोटा झाला होता. मात्र, दिवाळीच्या काळात प्रवासी वाढल्याने आणि अतिरिक्त फेऱ्या चालवल्याने ही आर्थिक परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. परिवहन खात्याच्या मते, ऑक्टोबर महिन्यात एकूण ₹१०४९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जरी हे लक्ष्य पूर्णपणे गाठता आले नसले, तरी दिवाळी हंगामातील विक्रमी कमाईने एसटी महामंडळाच्या खिशात दिलासा आणला आहे.