अमरावती,
ra su gavai memorial दिवंगत नेते रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या भव्य स्मारकाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. हा सोहळा दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारक, अमरावती मार्डी रस्ता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे, अमरावती येथे होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. हा क्षण अमरावतीसाठी विशेष गौरवाचा ठरणार आहे.
स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र उपस्थित राहणार आहेत.
स्मारकाविषयी माहिती
केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. (दादासाहेब) गवई यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकामध्ये ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. (दादासाहेब) गवई यांचे जीवन कार्य दर्शवणारे स्मृती सभागृह (म्युझियम) आणि अत्याधुनिक श्रोतगृह (ऑडिटोरियम) यांचा समावेश आहे. स्मारकाच्या दर्शनी भागावर दादासाहेबांचा १५ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच दादासाहेब गवई यांच्या जीवनाचा आणि कार्याचा प्रवास दर्शविणारे सभागृह तयार करण्यात आले आहे. स्मारकाच्या दर्शनी भागात दादासाहेबांचा २.५ फूट उंचीचा ब्राँझचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.ra su gavai memorial त्यांचा जीवनपट, दुर्मिळ छायाचित्रांसह, भिंतीवरील १६ डिजिटल पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शित केला जाणार आहे. अभ्यागतांना त्यांच्या कार्याबद्दल सखोल माहिती मिळावी यासाठी दृकश्राव्य कियॉस्क आणि व्हीडीओ वॉलची सोय उपलब्ध आहे. यासोबतच स्मारकात स्मरणिका दालन देखील उभारण्यात आले आहे. तसेच स्मारकाच्या पहिल्या माळ्यावर २०० आसनी क्षमतेचे अद्ययावत श्रोतगृह तयार करण्यात आले आहे. याशिवाय श्रोतगृहाच्या तळ मजल्यावर अभ्यागतांसाठी आणि कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या सुविधा म्हणून एक सुसज्ज किचन आणि उपहारगृहाचा समावेश आहे.