इस्लामाबाद,
Mohsin Naqvi's stubbornness २०२५ चा आशिया कप संपून महिनाभर उलटला असला तरी अजूनही विजेत्या भारतीय संघाच्या हाती ट्रॉफी आलेली नाही. २९ सप्टेंबर रोजी अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून भारताने आशिया कप जिंकला होता. परंतु त्यानंतर उद्भवलेल्या वादामुळे ट्रॉफी दुबईतच अडकली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे वैयक्तिकरित्या ट्रॉफी भारताला देण्याच्या हट्टावर ठाम आहेत, तर भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला आहे.
या वादानंतर बीसीसीआयने आता निर्णायक पाऊल उचलले असून हा विषय थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपुढे (आयसीसी) नेण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान दुबई येथे होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआय ट्रॉफीविषयीचा मुद्दा औपचारिकपणे मांडणार आहे. या बैठकीत इतर सदस्य देश भारताच्या भूमिकेला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ३० सप्टेंबरला झालेल्या एसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोहसीन नक्वी यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला होता. त्यांनी स्पष्ट केले की “आशिया कपची ट्रॉफी कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक मालमत्ता नाही. ती जिंकणाऱ्या संघाची मालकी आहे आणि टीम इंडिया तिची योग्य हक्कदार आहे.
मोहसीन नक्वी यांनी अलीकडेच दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, “२०२५ च्या आशिया कपची ट्रॉफी सध्या एसीसीच्या दुबई कार्यालयात आहे. बीसीसीआयचा अधिकारी किंवा टीम इंडियाचा खेळाडू येऊन माझ्याकडून ती घेऊन जावा.” परंतु बीसीसीआयने ही अट नाकारत, संस्थात्मक पातळीवरच ट्रॉफी हस्तांतरित करण्यात यावी, असा आग्रह धरला आहे. सध्या आशिया कप ट्रॉफी दुबईतील एसीसीच्या कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. आता आयसीसीच्या आगामी बैठकीत या प्रकरणावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

