वॉशिंग्टन,
mysterious sound of a black hole अलीकडेच दोन कृष्णविवरांची भीषण टक्कर झाली आणि त्यातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लाटा पृथ्वीवर पोहोचल्या आहे. या लाटा अवकाश आणि काळाला हलवून टाकणाऱ्या होत्या. या सिग्नल्सना LIGO, Virgo आणि KAGRA या अत्याधुनिक डिटेक्टरांनी टिपले. विशेष म्हणजे, या टक्करनंतर निर्माण झालेले कृष्णविवर पूर्वी पाहिलेल्या कृष्णविवरांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की हे कृष्णविवर आधीच्या एका कृष्णविवराच्या “मृत्यू”मधून जन्माला आले असावे, ज्याला वैज्ञानिक भाषेत “दुसऱ्या पिढीतील कृष्णविवर” म्हटले जाते.
११ ऑक्टोबर २०२४ रोजी शास्त्रज्ञांना GW241011 नावाचा सिग्नल मिळाला. यात दोन कृष्णविवरांची टक्कर झाली होती. एक सुमारे सूर्याच्या १७ पट मोठं आणि दुसरं सुमारे ७ पट लहान. या टक्करची तीव्रता एवढी जबरदस्त होती की अवकाशभर गुरुत्वीय तरंग निर्माण झाले आणि ते लाखो वर्षांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर पोहोचले. या सिग्नलचे विश्लेषण करताना शास्त्रज्ञांना समजले की मोठं कृष्णविवर अत्यंत वेगाने फिरत होते. इतक्या वेगाने फिरणारं कृष्णविवर यापूर्वी कधीही पाहण्यात आले नव्हते.
ही घटना पृथ्वीपासून तब्बल २.४ अब्ज प्रकाशवर्षे दूर घडली होती. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे, यातील एक कृष्णविवर आपल्या कक्षेच्या उलट दिशेने फिरत होते. ही पहिलीच वेळ होती की असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. त्यामुळे हे कृष्णविवर आधी दुसऱ्या कृष्णविवराशी टक्करून निर्माण झाल्याचे मानले जात आहे. या प्रक्रियेला शास्त्रज्ञ “श्रेणीबद्ध विलीनीकरण” (Hierarchical Merger) म्हणतात. जिथे तारे किंवा कृष्णविवर एकत्र येऊन वारंवार टक्कर घेत मोठे होत जातात. या शोधाने आइन्स्टाईनच्या “सामान्य सापेक्षतावाद सिद्धांताला” पुन्हा एकदा सत्य ठरवलं आहे. GW241011 च्या गुरुत्वीय लाटांमध्ये पूर्वी फक्त सैद्धांतिक पातळीवर भाकीत केलेले “ओव्हरटोन” किंवा “हार्मोनिक वेव्ह्स” प्रत्यक्षात आढळले, जे आइन्स्टाईनच्या भौतिकशास्त्रासाठी आणखी एक मोठं यश ठरलं.
याशिवाय, या शोधाचा संबंध कणभौतिकशास्त्राशीही जोडला जातो. काही सिद्धांतांनुसार “अल्ट्रालाईट बोसॉन” नावाचे नवीन कण कृष्णविवराच्या ऊर्जा शोषू शकतात. पण कृष्णविवर अजूनही अत्यंत वेगाने फिरत असल्याने, अशा कणांचे अस्तित्व सध्या तरी अप्रमाणित ठरत आहे. शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की आगामी काळात डिटेक्टरांमध्ये आणखी प्रगत सुधारणा झाल्यास, विश्वातील आणखी गूढ रहस्ये उलगडतील.