नागपूर,
Nagpur Burglary Case : लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंब सहकुटुंब मध्यप्रदेशात गेले, पण परतल्यावर घरात पसारा आणि कपाट उघडे दिसताच त्यांच्या आनंदावर विरजण पडले. शांतीनगरात मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
शांतीनगर येथील कश्यप कॉलनी, प्लॉट नं. बी/१ मध्ये राहणारे ईमरान खान अयुब खान (वय ३८) हे कुटुंबासह नातेवाईकांच्या लग्नासाठी मध्यप्रदेशात गेले होते. घराला कुलूप लावून ते सकाळी निघाल्यानंतर काही तासांतच चोरट्यांनी घराला लक्ष्य केले. दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून ३ लाखांची रोकड, १,५०० अमेरिकी डॉलर आणि सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे सात लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.
संध्याकाळी परतल्यावर चोरीचा प्रकार लक्षात येताच ईमरान खान यांनी तत्काळ शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक बारोडे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. शांतीनगर परिसरात सध्या घरफोड्यांच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, गुन्हेगारांचा शोध वेगाने घेण्याचे आश्वासन दिले आहे.