फलटण,
Phaltan female doctor's last video राज्यभर खळबळ उडवणाऱ्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणात तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. पोलिसांना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यामध्ये डॉक्टर जिवंत असतानाचे शेवटचे क्षण दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. या फुटेजमुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी आधीच मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बडणे आणि प्रशांत बनकर यांना अटक केली आहे.

या घटनेनंतर शुक्रवारी पोलिसांनी प्रशांत बनकरला एका फार्महाऊसवरून अटक केली, तर शनिवारी रात्री गोपाल बडणेने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दोन्ही आरोपींविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणच्या रूम क्रमांक ११४ च्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या दृश्यांनुसार, त्या खोलीत फक्त महिला डॉक्टरच दिसत आहे आणि इतर कोणी आत-बाहेर जाताना आढळलेले नाही. मध्यरात्रीनंतर काही हालचालींचे संकेत मिळाले असल्याचे पोलिसांचे प्राथमिक निरीक्षण असले, तरी अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पोलिसांनी सांगितले की, मिळालेल्या व्हिडिओ फुटेजचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे आणि प्रत्येक फ्रेम तपासली जात आहे. या फुटेजमधून घटनेपूर्वीच्या हालचाली, वेळ आणि संभाव्य संपर्कांबाबत महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात. या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असून, सीसीटीव्ही व्हिडिओ आणि मोबाईल डाटा विश्लेषणाच्या आधारे सत्य बाहेर येईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या संवेदनशील प्रकरणातील पुढील घडामोडींवर केंद्रित झाले आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. सत्या येथील या तरुण महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या सुसाईड नोटमध्ये तिने स्पष्टपणे लिहिले होते की ती शारीरिक आणि मानसिक छळ सहन करू शकत नाही.