रिसोड,
risod-agricultural-vendors : साथी पोर्टलच्या माध्यमातून काम करणे अत्यंत गैरसोयीचे होत असल्यामुळे साथी पोर्टल ला स्थगिती मिळावी या मागणीसाठी येथील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी २८ ऑक्टोबर रोजी कडकडीत बंद पाळला. साथी फेज २ पोर्टल पूर्णपणे अकार्यक्षम असून, हे पोर्टल बंद करून पारंपारिक विक्री प्रणाली सुरू ठेवावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

बियाणे विक्रीसाठी फेज २ पोर्टल चा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, या पोर्टलमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असून, विक्रेत्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकर्यांना बियाण्याचा पुरवठा वेळेवर होऊ शकत नाही. परिणामी शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय साथी पोर्टल २ चा वापर करण्याची शक्तीची अंमलबजावणी केल्यामुळे विक्रेत्यांना अनावश्यक त्रास होत आहे. या अडचणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने राज्यभर बंद पाळण्याच्या सूचना सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना माफदा संघटनेकडून तसेच जिल्हा कार्यकारणी कडून देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने शहरासह तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला.
शासनाकडून वेळोवेळी कृषी निविष्ठा विक्रेत्यांना विक्री संदर्भात जाचक अटी लादल्या जातात. फेज २ पोर्टल पूर्णपणे अकार्यक्षम असून, ग्रामीण भागात इंटरनेट नसल्यामुळे विक्रेते व शेतकरी दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे पोर्टल रद्द करून पारंपारिक विक्री प्रणाली सुरू ठेवावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास आजच्या बंद नंतर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.