सलमान खानबाबत 'ते' विधान पाकिस्तानच्या अंगलट

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
इस्लामाबाद,
Salman's statement is against Pakistan बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सौदी अरेबियामधील एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानामुळे पाकिस्तानने त्याला दहशतवादी घोषित केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानने आपल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख स्वतंत्र देश म्हणून केल्याने पाकिस्तान सरकार संतापले असून शाहबाज शरीफ सरकार सध्या या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी धावपळ करत आहे.

Salman 
 
वृत्तानुसार, पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सलमान खानचं नाव दहशतवादविरोधी कायद्यानुसार चौथ्या अनुसूचीत समाविष्ट केलं आहे. या यादीत नाव आल्यानंतर त्या व्यक्तीवर कट्टरपंथी कारवायांसाठी नजर ठेवली जाते. म्हणजेच, सलमान खानवर आता पाकिस्तानकडून औपचारिक लक्ष ठेवण्यात येणार आहे. घटनेचा उगम सौदी अरेबियामधील एका सांस्कृतिक कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमात बोलताना सलमान खान म्हणाला, हे बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगाणिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत; सौदी अरेबियामध्ये प्रत्येकजण प्रामाणिकपणे काम करतो.
 
सलमानच्या या वाक्यामुळे पाकिस्तानात संताप उसळला. कारण बलुचिस्तान हे पाकिस्तानचे संवेदनशील राज्य आहे, जिथे अनेक वर्षांपासून स्वातंत्र्याची चळवळ सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याने या आंदोलनावर कठोर दडपशाही केली असून तिथे अनेकदा हिंसाचार घडतो. अशा स्थितीत सलमान खानने बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानपासून वेगळा असा केल्याचे पाकिस्तानला खटकले. याच कारणावरून पाकिस्तान सरकारने त्याच्याविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. शाहबाज शरीफ सरकारवर देशांतर्गत स्तरावरही दबाव वाढला आहे, तर बलुच फुटीरतावादी गटांनी सलमान खानचं आभार मानत त्याचं समर्थन केलं आहे.
तथापि, सलमान खानने बलुचिस्तानचा उल्लेख जाणूनबुजून केला की सहजच तसा उल्लेख झाला, हे स्पष्ट झालेलं नाही. त्याच्याकडून किंवा त्याच्या टीमकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या सुमारे ४६ टक्के भागावर पसरलेला असून लोकसंख्या केवळ १.५ कोटी आहे. नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला हा प्रदेश आर्थिकदृष्ट्या मात्र अत्यंत मागासलेला आहे. चीनच्या गुंतवणुकीविरोधातही येथे सतत आंदोलने होत असतात. अशा पार्श्वभूमीवर सलमान खानच्या विधानाने पाकिस्तान सरकारची अडचण वाढली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.