विलास नवघरे
समुद्रपूर,
Samir Kunawa वर्धा जिल्ह्यासह समुद्रपूर तालुयातील प्रत्येक गावात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने थैमानाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कपासी व तुर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्तासाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधून समुद्रपूर तालुयातील ५ मंडल वगळले होते. याची माहिती मिळताच आ. समीर कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे पोटतिडकीने पाठपुरावा करून सुटलेल्या गिरड, कोरा, समुद्रपूर, वायगाव हळद्या, पाईकमारी या मंडळांचा समावेश करून घेत शेतकर्यांना मोठा दिला आहे. त्यामुळे आता या पाच मंडळातील शेतकर्यांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यातून शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्तासाठी पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमध्ये समुद्रपूर तालुयाचा समावेश केल्याने शेतकर्यांमध्ये मदतीची आशा पल्लवीत झाली होती. मात्र, या पॅकेजमधून गिरड, कोरा, समुद्रपूर, वायगाव हळद्या पाईकमारी या मंडळाला ६५ मिली पेक्षा कमी पाऊस पडल्याचे कारण पुढे करून या मंडळांना वगळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
या पाचही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही येथील शेतकर्यांवर अन्याय झाल्याचे आ. कुणावार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून माहिती घेत सुटलेल्या ५ मंडळातील शेतकर्यांना कोणत्याही हालतीत मदत मिळावी यासाठी तात्काळ मुंबई गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची मंत्रालयात भेट घेत पाच मंडळांचा अतिवृष्टी पॅकेजमध्ये समावेश करण्याचा विषय ठामपणे लावून धरला. आ. कुणावार यांची दखल घेत सुटलेल्या ५ मंडळाचा समावेश अतिवृष्टी पॅकेजमध्ये करण्यात आला आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकर्यांनी आ. कुणावार यांचे आभार मानले.