Understand before taking a home loan घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण त्या स्वप्नपूर्तीसाठी घेतलेले गृहकर्ज अनेकदा आनंदासोबत चिंता देखील आणते. विशेषतः, कर्ज घेताना स्थिर (Fixed) की चल (Floating) व्याजदर निवडायचा हा निर्णय छोटा वाटला तरी पुढील १५ ते २० वर्षांपर्यंत तुमच्या आर्थिक आराखड्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. स्थिर व्याजदराच्या गृहकर्जात सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा ईएमआय कायम एकसारखा राहतो. बाजारातील व्याजदरात कितीही चढ-उतार झाले तरी, तुमच्या मासिक हप्त्यात बदल होत नाही. त्यामुळे खर्चाचे नियोजन सोपे होते आणि आर्थिक स्थैर्य मिळते. मात्र, या स्थिरतेची किंमत थोडी जास्त असते.

सामान्यतः, स्थिर-दर कर्जांवर व्याजदर फ्लोटिंग दरांच्या तुलनेत १ ते १.५ टक्क्यांनी अधिक असतो. त्यामुळे भविष्यात बाजारातील व्याजदर कमी झाल्यास, तुम्ही त्या फायद्यापासून वंचित राहता. इतर कर्जदार कमी ईएमआय भरू लागतात, पण तुम्ही तेच हप्ते भरत राहता, हीच या पर्यायाची मर्यादा ठरते. फ्लोटिंग दरावरील कर्जाचा व्याजदर बाजारातील परिस्थितीनुसार बदलतो. तो रेपो रेट किंवा बँकेच्या बेंचमार्कशी जोडलेला असतो. जर आरबीआयने व्याजदर कमी केले तर तुमचा ईएमआय आपोआप कमी होतो. हा त्याचा सर्वात मोठा फायदा. पण जर दर वाढले, तर तुमचा ईएमआय अचानक वाढू शकतो आणि घरगुती अर्थसंतुलन बिघडू शकते. तरीही, दीर्घकाळ पाहता फ्लोटिंग रेट सामान्यतः स्वस्त ठरतो, कारण व्याजदर सतत जास्त राहात नाहीत.
जर तुम्ही आधी उच्च व्याजदराने कर्ज घेतले असेल आणि आता बाजारातील दर कमी झाले असतील, तर ‘बॅलन्स ट्रान्सफर’ म्हणजेच तुमचे कर्ज कमी दर देणाऱ्या दुसऱ्या बँकेत हलवणे, हा उत्तम पर्याय ठरू शकतो. फक्त ०.५% किंवा १% व्याजदर कपात झाली तरी कर्जाच्या संपूर्ण कालावधीत लाखो रुपयांची बचत होऊ शकते. मात्र, या प्रक्रियेत बँका प्रक्रिया शुल्क किंवा हस्तांतरण शुल्क आकारू शकतात, त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी त्या खर्चाचा विचार करणे गरजेचे आहे.
जर तुम्ही करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असाल, आणि दीर्घकालीन कर्ज कालावधी हाताळण्याची क्षमता असेल, तर फ्लोटिंग रेट हा अधिक फायदेशीर पर्याय ठरतो. तो लवचिकता देतो आणि दीर्घकाळात व्याजाचा भार कमी करतो. पण जर तुम्ही निवृत्तीच्या जवळ असाल किंवा निश्चित बजेटमध्ये काम करत असाल, तर स्थिर किंवा हायब्रिड दराचे कर्ज निवडणे योग्य ठरेल. हायब्रिड कर्जात काही वर्षे व्याजदर स्थिर राहतो आणि नंतर बाजाराशी जोडला जातो. त्यामुळे सुरुवातीला स्थैर्य आणि पुढे बचत दोन्ही लाभ मिळतात. थोडक्यात, गृहकर्ज घेताना फक्त EMI पाहू नका, तर व्याजदराचा दीर्घकालीन परिणाम समजून घ्या. योग्य निर्णय घेतल्यास तुमचे स्वप्नातील घर केवळ तुमचे होईलच, पण लाखो रुपयांची बचतही तुमच्या खिशात राहील.
टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.