मानोरा,
washim-news : तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी गावचे निवासी महाराज परिवारातील रमेश तुकाराम महाराज उर्फ फकीर बाबा यांनी शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्यांसह अनुषांगिक समस्या सोडविण्यासाठी सुरू केलेले शोले आंदोलन प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे स्थगित केले आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांची वन्य प्राण्यांकडून होणारी नासाडी थांबविण्यासाठी तारकुंपणाकरिता शत प्रतिशत अनुदान देण्यात यावे, हंगाम संपल्यानंतर रोजगारासाठी स्थलांतरित होणार्या मजूर व अति अल्पभूधारक शेतकर्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, पोहरादेवी धावंडा, पोहरादेवी, काकड, चिखली पांदन रस्ता तातडीने तयार करण्यात यावा या व इतरही मागण्यांच्या पूर्ततेसाठी पोहरादेवी येथे शोले स्टाईल आंदोलन नुकतेच आरंभले होते. महसूल प्रशासनाने बाबांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागणीचा पाठपुरावा शासनाकडे करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने फकीर बाबांनी शोले आंदोलन तूर्तास थांबविले आहे. शेतकर्यांच्या हितासाठी आता पावेतो ३० पेक्षा अधिक उपोषणे व आंदोलन करूनही केवळ लेखी आश्वासनाशिवाय कुठलीच ठोस उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याची खंत रमेश महाराज यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.