मुंबई,
abhanga tukaram संत तुकारामांच्या जीवनावर आधारित असंख्य कथा आणि चित्रपट आपल्याला माहिती आहेत, परंतु त्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं आणि आजवर दुर्लक्षित राहिलेलं पात्र म्हणजे – आवली. संत तुकारामांच्या पत्नीसोबत अनेक कथा, श्रद्धा आणि भावनिक नातं जडलेलं असतानाही, तिच्या त्यागाची आणि सहनशीलतेची फारशी चर्चा झाली नाही. आता हे चित्र बदलणार आहे – कारण दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आपल्या आगामी चित्रपटातून ‘आवली’ या स्त्रीपात्राला केंद्रस्थानी आणत आहेत.
‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे झळकणार असून, तिच्या अभिनयातून एक संघर्षशील, परंतु कोमल मनाची, अध्यात्माशी जुळलेली स्त्री प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात आवली ही फक्त संत तुकारामांची पत्नी नसून त्यांच्या साधनेतील एक महत्त्वाचा भाग म्हणून सादर केली जाते. तिचा त्याग, समर्पण, पतीच्या अध्यात्माला दिलेली साथ आणि संसाराचे ओझं हसत-रडत वाहण्याची तिची चिकाटी – हे सर्व या व्यक्तिरेखेच्या गहिरेपणाला अधोरेखित करतात.स्मिता शेवाळे हिने याआधी अनेक भूमिका साकारल्या असल्या, तरी ‘आवली’सारखी ताकदीची भूमिका ही तिच्या कारकिर्दीतील एक निर्णायक टप्पा ठरेल, असं चित्रपटसृष्टीत बोललं जात आहे. तिची संवादफेक, देहबोली आणि डोळ्यांतून उमटणारे भाव – हे सर्व आवलीच्या व्यक्तिरेखेला एक अध्यात्मिक स्पर्श देतात.
फर्जंद फत्तेशिकस्त, abhanga tukaram पावनखिंड आणि सुभेदार’ यांसारखे इतिहासप्रेमी चित्रपट देणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांचा हा नवा सिनेप्रयोग वारकरी परंपरेच्या एका गूढ आणि भावनिक पैलूला उजाळा देणारा ठरणार आहे. त्यांच्या मते, “आवली ही फक्त घर सांभाळणारी स्त्री नव्हे, ती तुकारामांच्या अध्यात्माला आधार देणारी आणि त्यांच्या अध्यात्माला वास्तवाचं भान देणारी एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे.”वारकरी संप्रदायात संत तुकारामांचे अभंग आजही भक्तांच्या ओठांवर असतात, पण त्या अभंगांच्या निर्मितीच्या काळात पाठीशी खंबीरपणे उभी असलेली ‘आवली’ ही स्त्री या चित्रपटातून प्रथमच सखोलपणे प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘अभंग तुकाराम’ केवळ संताच्या जीवनावर आधारित चित्रपट नाही, तर तो त्यांच्या नात्यातील गूढ अध्यात्म, स्त्रीचा त्याग, आणि प्रपंचातील साधनेचा गूढ प्रवास उलगडणारा एक सिनेप्रयोग ठरणार आहे. चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून, प्रेक्षकांना लवकरच एका वेगळ्याच अध्यात्मिक अनुभवाची मेजवानी मिळणार आहे.