गावाच्या विकासासाठी सकारात्मक विचाराने पुढे या : तडस

*देवळीत दसरा मेळावा उत्साहात

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
देवळी, 
deoli-dussehra-gathering : रावण महाज्ञानी आणि विद्वान शासक होता व शिवभक्त होता. परंतु, रावणाला ज्ञानाचा, साधनेचा अहंकार होता. आपले स्वामित्व सिद्ध करण्यासाठी असत्य बोलणे, अन्याय करणे, अनीतीच्या मार्गाचा अवलंब करणे असे अनेक दुर्गुण रावणाला चिकटले. त्याचा नाश सत्यवचनी, न्यायी, नीतिमान अशा श्रीरामाने केला. सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनीतीवर विजय झाला म्हणून या दिवशी विजयादशमी हा सण साजरा केला जातो. येथे रावनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे.
 
 
J
 
 
 
आज शेतकर्‍यांवर मोठे संकट आहे, सतत पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन व कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी केन्द्र व राज्य सरकार उभे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केल्यामुळे शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे. सकारात्मक विचारामुळे देवळी शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. पुढेही देवळी शहराचा विकास करावयाचा असेल तर सकारात्मक विचार घेऊन सर्वांना पुढे जायला हवे, असे आवाहन माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
 
 
स्थानिक मिरननाथ यात्रा मैदान येथे माजी खासदार श्री. रामदासजी तडस क्रीडा अकॅडमीच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्यात माजी खासदार रामदास तडस बोलत होेते. यावेळी अतिथी म्हणून देवळी आ. राजेश बकाने, पोलिस निरीक्षक अमोल मंढारकर, तहसीलदार समर्थ क्षीरसागर, नपचे माजी उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, भाजपाचे राहुल चोपडा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी कारोटकर, भाजपा शहर अध्यक्ष उमेश कामडी, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष विद्या झिलपे आदींची उपस्थिती होती.
 
 
तडस पुढे म्हणाले की, स्वदेशी हा आत्मनिर्भर आणि विकसीत भारताचा पाया आहे. स्वदेशी वस्तू खरेदी करणे ही महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांना श्रद्धांजली ठरेल असे सांगुुन त्यांनी संघ शताब्धी महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. राजेश बकाने यांनी विजया दशमी निमित्त शुभेच्छा दिल्या. आमदार म्हणून सर्व समावेशक विकास करण्यासाठी प्राधान्य देऊ असे आश्वासन देऊन देवळीमध्ये माजी खासदार रामदास तडस यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास केला. या पुढेही शहराच्या विकासासाठी सोबत राहील असेही ते म्हणाले. संचालन शुभांगी कुर्जेकर यांनी केले तर आभार रवी कारोटकर यांनी मानले.