कनाडा,
Indian films banned Canada कनाडा येथील ओकविल शहरातील Film.Ca Cinemas या चित्रपटगृहावर अल्प काळात दोन हिंसक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमुळे चित्रपटगृहात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. हे हल्ले भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान घडल्याने खालिस्तानवादी आतंकवाद्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.
पहिला हल्ला २५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ५:२० वाजता झाला. दोन संशयितांनी चित्रपटगृहाच्या दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगेमुळे केवळ इमारतीला सौम्य नुकसान झाले, आत आग पसरण्यापासून वाचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संशयित काळ्या कपड्यांत आणि मास्क घातलेले होते. हल्ल्याच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ग्रे आणि पांढऱ्या रंगाच्या दोन SUV गाड्या दिसल्या ज्यातून ते आले आणि नंतर पळून गेले.दुसरा हल्ला २ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १:५० वाजता घडला. एका संशयिताने चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वारावर गोळ्या झाडल्या. हा हल्लेखोर जाडसर शरीराचा आणि काळ्या कपड्यांत व मास्क घातलेला होता. दोन्ही हल्ले लक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Film.Ca Cinemas चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ नॉल यांनी सांगितले की, "फक्त याच कारणासाठी की आम्ही दक्षिण आशियाई चित्रपटांचे प्रदर्शन करत होतो, कोणी तरी चित्रपटगृह जाळण्याचा प्रयत्न केला." ते पुढे म्हणाले की, "आम्हाला आमच्या समुदायाला सुरक्षित वाटावे आणि प्रेक्षकांना चित्रपटांचा अनुभव देण्याचा अधिकार आहे."
पण सुरक्षेचा विचार करून चित्रपटगृहाने दोन भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहाचे म्हणणे आहे की, "आम्ही कोणाच्या दबावाखाली येऊ इच्छित नाही, पण कर्मचारी व प्रेक्षकांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची पहिली प्राथमिकता आहे." हॅल्टन पोलिस ह्या प्रकरणाची तपासणी करत आहे.या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सिख्स फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेने ‘Made in India’ या सर्व चित्रपटांवर आणि उत्पादनांवर कनाडा सरकारने बंदी घालावी अशी मागणी केली आहे. SFJ च्या जनरल काउंसल गुरपतवंत सिंह पन्नून यांनी म्हटले की, “आता ‘Made in India’ फक्त सांस्कृतिक ओळख नाही, तर मोदी सरकारचा एक राजकीय शस्त्र बनला आहे, जो हिंदुत्वाची द्वेष भावना पसरवतो.”त्यांनी भारतीय चित्रपट आणि उत्पादनांमध्ये हिंसक विचारसरणीचे प्रतिबिंब असल्याचा दावा केला असून, यामुळे भारत हिंदुत्ववादी तानाशाहीकडे सरकतोय, असे त्यांनी म्हटले आहे. SFJ ने कनाडा सरकार, धोरणकर्ते, व्यापारी आणि सांस्कृतिक संस्थांना याबाबत कठोर पावले उचलण्याची विनंती केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की हा मुद्दा केवळ व्यापाराचा किंवा सिनेमाचा नाही, तर कनाडा मधील लोकशाही संवेदनशीलतेचे रक्षण करण्याचा आहे.
या घटनांमुळे ओकविलमधील भारतीय चित्रपटप्रेमींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कशी वाढवावी यावर चर्चा सुरू आहे. घटनांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात सुरक्षा उपाय अधिक कडक करण्यात येऊ शकतात.