जळगाव,
old dispute in jalgav जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात दसऱ्याच्या रात्री झालेली हिंसक घटना संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे. दोन कुटुंबांमधील जुना वाद पुन्हा उफाळला आणि त्यातून तरुण ज्ञानेश्वर भिका पाटील (वय 27) यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोटावर आलेल्या वारामुळे त्याचे मूत्रपिंड फाटले होते, ज्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली.
घटनेच्या तपशीलानुसार, गुरुवारी (२ ऑक्टोबर) रात्री उशिरा दोन कुटुंबांमध्ये वादविवाद भडकला आणि तो हिंसक स्वरूपात बदलला. ज्ञानेश्वरवर दोन तरुणांनी धारदार शस्त्राने तीन वेळा हल्ला केला. हल्ल्यात त्याचे पोट, डावा मांडी व शरीरावर गंभीर जखमा झाल्या. तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरला स्थिती गंभीर असल्याने एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्नांना अपयश येत, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात एकत्र आले. येथे मोठा आक्रोश आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. एमआयडीसी पोलिसांनी तातडीने रुग्णालयात बंदोबस्त वाढवला. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती आणि आरोपींचा शोध सुरू आहे. दसऱ्याच्या सणाच्या रात्री घडलेली ही हिंसक घटना जळगावातील नागरिकांसाठी धक्का देणारी ठरली असून, प्रशासनाकडून सुरक्षा आणि तपास यावर विशेष भर देण्यात आला आहे.