नवी दिल्ली,
Ratan Tata TCS जागतिक स्तरावर टीसीएसमध्ये सुरू असलेल्या नोकरकपातीमुळे कंपनीवर टीकेचा सामना करावा लागत आहे. काही लोकांच्या मते, कर्मचार्यांना जबरदस्तीने राजीनामा घ्यायला लावले जात आहे. अशा परिस्थितीत, टीसीएसने कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि सहानुभूतिपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने असे ठरवले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य तंत्रज्ञानाच्या बदलत्या गरजांशी जुळत नाही किंवा जे नवीन कामकाजाच्या प्रणालींशी जुळवून घेण्यात अपयशी ठरत आहेत, त्यांना बाहेर काढले जाईल, मात्र त्यांना आर्थिक आधार देण्यात येईल.
टीसीएसने ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात आहे, त्यांना सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतचे वेतन पॅकेज दिले जाणार आहे. यामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि ते नवीन संधी शोधण्यास सक्षम होतील. या निर्णयातून रतन टाटांच्या मूल्यांचा वारसा टिकून असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून मुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र आता त्यांना वेतन पॅकेज देण्याची तयारी कंपनीने दाखवली आहे.
कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधी आणि पदानुसार वेतन पॅकेज ठरवले आहे. १५ वर्षांहून अधिक सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. तसेच, ‘बेंच’वर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा प्रस्ताव आहे, जे आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणत्याही प्रोजेक्टवर कार्यरत नसतात. अशा कर्मचाऱ्यांना साधारण तीन महिन्यांचे नोटीस पगार दिले जातील, तर १० ते १५ वर्ष सेवा केलेल्या बेंच कर्मचाऱ्यांना १.५ वर्षांचे वेतन पॅकेज मिळू शकते.
टीसीएसचा हा निर्णय केवळ कर्मचार्यांना बाहेर काढण्यापुरताच मर्यादित नाही, तर त्यांचा भविष्यातील आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि कौशल्य वाढीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आहे. कंपनीचे स्पष्ट धोरण आहे की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात टिकण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे आणि ज्यांना हे शक्य नाही, त्यांना योग्य आर्थिक आधार देणे कंपनीची जबाबदारी आहे. या निर्णयामुळे टीसीएसने जागतिक स्तरावर नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती आणि जबाबदारी यांचा संदेश दिला आहे. हे पाऊल रतन टाटांच्या नेतृत्व मूल्यांचा वारसा जिवंत ठेवल्याचे उदाहरण आहे आणि कंपनीच्या मानवकेंद्रित धोरणाची साक्ष देणारे आहे.