ग्रामपंचायत अधिकारी विजय ठेंगेकर
ग्रामपंचायत अंबोडा येथे महाश्रमदान कार्यक्रम
स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या थीमवर कार्य
आर्णी,
राष्ट्रीय स्तरावरील Swachh Bharat Abhiyan स्वच्छता मोहीम हा भारत सरकारचा सर्वात जलद आणि क्रांतिकारी उपक्रम आहे ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधून त्याचा वापर वाढवून व रस्ते स्वच्छ करून सर्वांसाठी मूलभूत स्वच्छतेची सोय निश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे ही मोहीम उद्दिष्टांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वच्छ निरोगी भारताच्या निर्मितीसाठी सर्वजण कटिबद्ध आहोत. कारण मानवी जीवनासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.
हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या मनोवृत्तीत बदल घडवणारा ठरावा. Swachh Bharat Abhiyan स्वच्छता ही सरकारी आदेश नव्हे, तर समाजाचा उत्सव बनावा. गांधीजींच्या स्वच्छता हीच खरी सेवा या विचारांना कृतीतून मूर्त स्वरूप देण्यात यावे. ग्रामीण भागात श्रमदान संस्कृती अधिक दृढ व्हावी व आगामी पिढीसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण तयार व्हावे, असे प्रतिपादन ग्रामपंचायत अधिकारी विजय ठेंगेकर यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ मोहिमेअंतर्गत आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणार्या ग्रामपंचायत अंबोडा येथे महाश्रमदान पार पडले.
एक दिवस, एक तास, साथ या घोषवाक्याने गावात Swachh Bharat Abhiyan स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय अंबोडा, विकासगंगा समाजसेवी संस्था घाटंजी व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असून अभियानासाठी ‘स्वभाव संस्कार स्वच्छता’ ही थीम निश्चित करण्यात आली आहे.
जिल्ह्यात या अभियानास लोकचळवळ बनविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा आडे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विलास मालाधरी, स्वच्छ भारत मिशन पंचायत समितीच्या जाधव, सुमीत डकरे, कनिष्ठ अभियंता मार्शतवार, ग्रामपंचायत अधिकारी विजय ठेंगेकर, मुख्याध्यापक अंकुश मोरे, ग्रामपंचायत सदस्य अॅड. अतुल राठोड, अजय पाटील, विकासगंगा समाजसेवी संस्था व रिलायन्स फाउंडेशनचे क्षत्रिय समन्वयक वैभव गायकी व प्रदीप पवार उपस्थित होते.
Swachh Bharat Abhiyan या अभियानात ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी, महिला बचतगट, अधिकारी व कर्मचार्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सर्वांनी गाव स्वच्छ मोलाचे योगदान दिले. यावेळी अंगणवाडीकरिता सेविका लता पाटील आणि जिप उच्च प्राथमिक मराठी शाळेकरिता मुख्याध्यापक अंकुश मोरे यांना कचराकुंड्या व झाडूंचे वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी परिसर, शाळा, शासकीय इमारती, मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. विकास गंगा समाजसेवी संस्था व रिलायन्स फाऊंडेशनने झाडू, कचराकुंड्या, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, फावडे, घमेली साहित्य पुरवले व गोळा झालेल्या कचर्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.