तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
tehsildar-naib-tehsildar-suspended : न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही शेतजमिनीचे फेरफार करण्यास टाळाटाळ करणे भद्रावतीचे तहसिलदार राजेश भांडारकर व नायब तहसिलदार सुधीर खांडरे यांना भोवले असून, संबंधित शेतकर्याने तहसिल कार्यालयातच विष प्राशन केल्यानंतर झालेल्या कारवाईत या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही शेतजमिनीच्या फेरफार होत नसल्याने प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी थेट भद्रावती तहसील कार्यालयातच विष प्राशन केले होते. ही धक्कादायक घटना शुक्रवार, 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली होती. त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 मधील तरतुदीअन्वये भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
परमेश्वर मेश्राम यांचे कुरोडा येथील शेतजमिन सर्व्हे नं. 86, 87, 95 व 98 प्रकरणी आरसीएस क्रमांक 16/2012 मधील 12 ऑगस्ट 2015 रोजीच्या निकालानुसार, अधिकार अभिलेख गांव नमुना क्रमांक 7 मध्ये विश्वनाथ आडकू मेश्राम व त्यांच्या मृत्यूनंतर परमेश्वर मेश्राम व इतर कायदेशीर वारसांची नावे लावण्याबाबतची कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र, दिवाणी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता प्रकरणात मालको हक्काबाबत वाद असल्याचे नमूद करून, अर्जदाराचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. या प्रकरणी राजेश भांडारकर व सुधीर खंडारे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतुदींचा स्पष्टपणे भंग केल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
परमेश्वर ईश्वर मेश्राम (55, रा. मोरवा) शेतकर्याचे नाव आहे. मेश्राम यांच्या पत्नीच्या माहितीनुसार, कुरोडा गावातील शेती ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. त्यांच्या वडिलांनी हयातीतच ही जमीन विधिवत त्यांच्या नावावर केली होती. मात्र, त्यानंतर इतर नातेवाइकांनी आक्षेप घेत न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने मेश्राम यांच्या बाजूने निकाल दिला असून, जमीन त्यांच्याच नावे असल्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानंतर त्यांनी फेरफारसाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, महिन्यांनंतरही महसूल विभागाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. उलट, विविध कारणांनी प्रकरण प्रलंबित ठेवले गेले. महसूल पंधरवडा मोहिमेत निकाली निघेल, अशी आशा होती. मात्र, वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्यांना केवळ निराशाच पदरी पडली. शेवटी, मेश्राम यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच विषारी द्रव प्राशन केले होते. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवला. त्यानुसार तहसिलदार व नायब तहसिलदार यांचे निलंबन करण्यात आले.