मुख्याधिकारी आमचं ऐकत नाही; कारवाई करा

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा पत्रकार परिषदेत आरोप

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
समुद्रपूर, 
Wardha News : सर्वसाधारण सभेमधून मुख्याधिकारी अध्यक्षांची परवानगी न घेता सभा सोडून जाणे, सभेची मंजुरी न घेता कंत्राटदाराचे देयक काढणे व कार्यालयात नियमित न येणे असे आरोप करीत मुख्याधिकारी आमचे ऐकत नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई जिल्हाधिकार्‍यांनी करावी अशी मागणी नगराध्यक्ष योगिता तुळणकर, उपनगराध्यक्ष बाबाराव थुटे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.
 
 
 
K
 
 
 
सोमवार २९ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचन सुरू असताना झालेल्या वाद- विवादात मुख्याधिकारी अध्यक्षांची परवानगी न घेता सभा सोडून गेल्या हा सभेचाच नाही तर समुद्रपूरवासियांचा अपमान असल्याचा आरोप करण्यात आला. पूर्णवेळ मुख्याधिकारी असताना सुद्धा कार्यालयात नियमित येत नसल्यामुळे विकासाच्या कामांना खिळ बसलेली आहे. कंत्राटदाराचे देयक सभेची मंजूरी न घेता काढल्याचा आरोप यावेळी नगराध्यक्ष तुळणकर, उपनगराध्यक्ष थुटे यांनी यावेळी केला.
 
 
या संदर्भात मुख्याधिकारी पौर्णिमा गावित यांच्यासोबत संपर्क केला असता त्या म्हणाल्या की, २९ सप्टेंबर रोजी विभागस्तरीय आढावा बैठक व सर्वसाधारण सभा एकाच वेळी १२ वाजता असल्याने सभेचे दायित्व प्राधिकृत अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आले होते. परंतु, सभेला मुख्याधिकारीच सचिव म्हणून असावे असा पवित्रा असल्याने सभा तहकूब करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २८ जुलै रोजी नगरपंचायत समुद्रपूर व कंत्राटदारांची संयुत बैठक व संयुत पाहणी करून देयक अदा करण्यात आले. सभेला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास वारंवार योजने संदर्भात कळवण्यात आले होते. कंत्राटदार व अध्यक्षांमध्ये काही कारणाने वाद झाला आहे. प्रशासन नियम, अधिनियम यानुसार चालवण्याचा व नियमबाह्य कोणतेही काम करू शकणार नाही असा ठाम भुमिकेमुळे कदाचित असे आरोप करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी पौर्णिमा गावित यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले.