वर्धा शहरालगतच्या गावांचा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करा : पालकमंत्री डॉ. भोयर

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
Pankaj Bhoyar : वर्धा शहरालगतच्या पिपरी मेघे व १३ गावांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. तसेच अनेक कुटुंबांना नळ जोडण्या देण्यात आल्या नाही. या गावांच्या पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करुन नियमित पाणी उपलब्ध करुन द्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
 
 
 
K
 
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात शहरालगतच्या गावांना सुरळीत पाणी पुरवठा, वर्धा शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना व वीज वितरण कंपनीच्या विविध विषयांचा आढावा बैठकीत÷यांनी निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., माजी खासदार रामदास तडस, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बुरडे, नपचे मुख्याधिकारी विजय देशमुख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, उप अभियंता महेश मोकलकर, वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता स्मिता पारखी, आदी उपस्थित होते.
 
 
शहरालगतच्या गावांना सहा, सात दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे सरपंच, सचिवांना गावकर्‍यांच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यामुळे गावांना पाणी पुरवठा नियमित होणे आवश्यक असल्याची बाब सरपंचांनी बैठकीत मांडली. त्यानंतर पुरवठ्यातील अडचणी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी जाणून घेतल्या. पुरवठ्यातील अडचणी दूर करुन सुरळीत पाणी पुरवठा करावा, असे ना. भोयर यांनी जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना सांगितले.
 
 
वर्धा शहराची पाणी पुरवठा योजना जुनी आहे. त्यामुळे पाईपलाईन लिकेजेस, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, या समस्या निकाली काढण्यात याव्या. शहर व लगतच्या गावांसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येत असून त्याचे सादरीकरण यावेळी कार्यकारी अभियंता बुरडे यांनी केले. वाढीव योजना करताना भविष्यातील लोकसंख्या, नळ जोडणी, पाणी वितरण व साठवणूक व्यवस्थेचा परिपूर्ण विचार करण्यात यावा, असे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले. वरुड गावाला सेवाग्राम योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले.
 
 
वर्धा शहर, सेवाग्राम व लगतच्या गावांना सौरऊर्जेद्वारे सुरळीत पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाणी पुरवठा योजना सौरऊर्जेवर करण्यात येणार आहे. त्यासाठी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जातील. त्याअनुषंगाने सोलर अ‍ॅण्ड सायन्स पार्कचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ना. भोयर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना दिले.