नागपूर,
AIAPGET 2025, ‘ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट-२०२५’ मध्ये अर्ज करताना नावात तफावत झाल्याने प्रवेश प्रक्रियेत अडथळा आलेल्या विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला. न्यायमूर्ती रजनीश आर. व्यास यांच्या दिवाळी अवकाश खंडपीठाने मंगळवारी दिलेल्या आदेशात संबंधित संस्थेला विद्यार्थिनीला तात्पुरता प्रवेश देण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्या डॉ. चंचल मंगरुड यांनी अर्जात आपले नाव “चंचल मंगरूड” असे नमूद केले होते.

मात्र, जात प्रमाणपत्रावर तिच्या वडिलांचे नाव “गोपाल राठोड” असल्याचे आणि आडनाव वेगळे असल्याचे कारण देत परीक्षा घेणाऱ्या संस्थेने तिच्या प्रवेशावर आक्षेप घेतला होता. यावर विद्यार्थिनीने न्यायालयात स्पष्ट केले की “मंगरुड” हे तिचे गोत्र असून “राठोड” हे आडनाव आहे. न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की हा विषय विद्यार्थिनीच्या भविष्यासंदर्भात आहे आणि अंतिम निर्णय येईपर्यंत तिच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ नये. त्यामुळे न्यायालयाने तात्पुरता दिलासा देत संबंधित अधिकाऱ्यांना तिला प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. तसेच, याचिकाकर्त्याला राष्ट्रीय प्रवेश संस्थेला खाजगी मार्गाने नोटीस पाठवण्याची परवानगी देण्यात आली असून तसे न केल्यास ५०० रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड.एस.देशपांडे यांनी युक्तिवाद केला.