आर्वीत कारभारींची पत्नीसाठी फिल्डींग!

नप निवडणूक वारे...

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
अभय दर्भे
आर्वी, 
arvi-municipal-council-elections : येथील नगराध्यक्षपद हे महिलेसाठी आरक्षित झाल्याने आता नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणार्‍या नेत्यांनी आपल्या सौभाग्यवतींना पुढे केल्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांची नावं मागे पडत असल्याचे चित्र आर्वीत आहे. पत्नीला उभे करताना पतीनेही स्वत:चे फेसबुक, व्हॉट्अ‍ॅप स्टेटस बदलले आहेत.
 
 
JLK
 
कित्येक वर्षांपासून रखडलेली नपची निवडणूक होण्याचे संकेत आहेत. यावेळी नपची धुरा महिलेच्या हाती राहणार आहे. त्यामुळे महिला उमेदवारांचा शोध घेणे सुरू केले आहे. काँग्रेसने जाहिरात देऊन तर अन्य राजकीय पक्षांनी उमेदवारी करता अर्ज मागवले आहेत. गेल्या निवडणुकीत येथील नगराक्षध्यासह सर्व नगरसेवक हे भाजपाचे असल्यामुळे यावर्षी इच्छुकांची संख्या भाजपाकडे जास्त आहे.
 
 
काँग्रेसने स्वबळाचा नारा देत नगराध्यक्ष व नगरसेवकांकरिता सक्षम उमेदवार आमच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच अग्रवाल विरुद्ध मोहोड ही काँग्रेसमधील दुही बाहेर पुढे आली. खा. अमर काळे नगराध्यक्ष पदाकरिता कोणाला उमेदवारी देतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. ते वेळेवर उमेदवार जाहीर करतील, अशी चर्चा आहे. ही निवडणूक खासदार विरुद्ध दोन सत्ताधारी आमदार अशी होईल. नगरपरिषद अंतर्गत १२ प्रभाग असून २५ नगरसेवक व एक नगराध्यक्ष असे २६ जण पदावर विराजमान होणार आहे. आर्वी नगरपरिषद शहराची मतदार संख्या ४२ हजार २२२ च्या जवळपास मतदार आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्या इच्छुक उमेदवारांची यादी तयार करत असून आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याचा दावा करून युती व आघाडी न झाल्यास स्वातंत्र लढण्यासंबंधीचाही विचारही राजकीय पक्ष करीत आहेत.
 
 
भाजपा, राकाँ (श. प) गट, काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उबाठा, रिपब्लिकन पार्टी, अपक्ष, बंडखोर, गटाचे कोण उमेदवार उभे राहणार याकडे लक्ष लागले आहे. शहरात राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या अनेक महिलांनी आपल्या कर्तुत्वाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपल्या पक्षात असलेल्या अशा इच्छुक महिलांचा उमेदवारी देताना प्राधान्याने विचार होईल की बाजूला सारल्या जाईल हे बघावे लागेल.
 
 
नगराध्यक्षाकरिता २५ तर नगरसेवकाकरिता ८५ इच्छूक
 
 
भाजपाची उमेदवारी मागण्यासाठी लांबलचक रांग आहे. नगराध्यक्ष पदाकरिता २५ पेक्षा जास्त तर नगरसेवकाकरिता ८५ पेक्षा जास्त इच्छूकांनी आपले अर्ज पक्षाकडे दिले आहे. काहींनी स्वेच्छेने तर काहींना सांगितल्याप्रमाणे सुद्धा अर्ज केल्याची चर्चा आहे. निष्ठावानालाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी अशी सामान्य भाजपा कार्यकर्त्यांमधून चर्चा आहे.