रेल रोको आंदोलन रद्द...प्रहार संघटनेने घेतला माघार!

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Bachchu Kadu Rail Roko movement cancelled राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून सुरू असलेल्या तीव्र संघर्षाला आता नवा वळण मिळालं आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केलेल ‘रेल रोको आंदोलन’ अखेर रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बच्चू कडू यांची आज महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या चर्चेत शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याच्या मागणीवर निर्णायक तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
 
Bachchu Kadu Rail Roko movement cancelled
गेल्या महिनाभरापासून बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनाच्या मार्गावर आहेत. नागपूरमध्ये शेतकऱ्यांसह प्रहारचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असून, कालच बच्चू कडूंनी चर्चेत ठोस निर्णय न झाल्यास ‘रेल रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, परिस्थिती चिघळू नये म्हणून आणि सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आज झालेल्या न्यायालयीन सुनावणीत बच्चू कडूंचे वकील हरिओम ढगे यांनी न्यायालयाला सांगितले की, उद्याचं ‘रेल रोको’ आंदोलन रद्द करण्यात आलं असून, यापुढील निर्णय सरकारशी चर्चेनंतर घेण्यात येईल. न्यायालयाने या भूमिकेचे स्वागत केले आणि प्रशासनालाही शांततेच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. पोलिसांकडूनही हलफनाम्यात नमूद करण्यात आलं की, नागपूरसह राज्यातील सर्व रस्ते आणि महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू आहे.
बच्चू कडू यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं की, शेतकरी प्रश्नावर ठोस निर्णय न झाल्यास ते तीव्र आंदोलन उभारतील. मात्र, आता त्यांनी सरकारशी संवाद साधण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. नागपूरहून निघताना बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत. सरकारकडून सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी राजकारणात महत्त्वाचा ठरणारा हा क्षण असताना, बच्चू कडूंच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेची किरणे दिसू लागली आहेत.