चीन-रशियाचा 'सेक्स वॉर'...नेमका काय आहे प्रकार?

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
बीजिंग,
China-Russia sex war सिलिकॉन व्हॅलीमध्ये आता पारंपरिक सायबर हेरगिरी आणि आर्थिक गुप्तहेरगिरीच्या पलीकडे जाऊन एक नवा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे तो म्हणजे “सेक्स वॉरफेअर”. चीन आणि रशियाने अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रावर अप्रत्यक्ष आघात करण्यासाठी आता रोमँटिक हेरगिरीचा वापर सुरू केला आहे. या मोहिमेचा उद्देश स्पष्ट आहे. अमेरिकेची बौद्धिक संपदा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पना क्षेत्रातील गुप्त माहिती मिळवून त्या देशाच्या तांत्रिक वर्चस्वाला धक्का देणे.
 
 

China-Russia sex war 
या “सेक्स वॉरफेअर”मध्ये परदेशी एजंट अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि उद्योजक यांच्याशी वैयक्तिक नातेसंबंध प्रस्थापित करतात. ऑनलाइन मैत्री, रोमँटिक संवाद, किंवा अगदी विवाहाच्या माध्यमातून. या संबंधांचा उपयोग करून संवेदनशील डेटा, तांत्रिक रहस्ये आणि सरकारी प्रकल्पांशी संबंधित गुप्त माहिती हस्तगत केली जाते. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुण चिनी महिलांनी लिंक्डइनसारख्या व्यावसायिक नेटवर्किंग साइट्सवरून अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हेरगिरीचे जाळं तयार केल्याची उदाहरणं नोंदली गेली आहेत.
एका माजी गुप्तचर अधिकाऱ्याने उघड केल की, एका रशियन महिलेने अमेरिकन एरोस्पेस अभियंत्याशी लग्न करून दीर्घकाळ त्याच्या माध्यमातून संवेदनशील सरकारी कागदपत्रे आणि संशोधन माहिती मिळवली. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या मते, अशा प्रकारच्या 'हनीपॉट' मोहिमा आजही सक्रिय आहेत आणि अनेकदा त्यांचा मागोवा घेणं कठीण ठरतं. तज्ज्ञ सांगतात की या गुप्तहेरगिरीमागे केवळ लैंगिक आकर्षण नव्हे तर अत्यंत नियोजनबद्ध धोरण आहे. चीन आणि रशियाचे उद्दिष्ट एकच अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील पकड सैल करणे. दरवर्षी अमेरिकेला सुमारे ६०० अब्ज डॉलरचं नुकसान होतं, ज्यामध्ये बहुतांश नुकसान चीनशी संबंधित असल्याचं उघड झालं आहे. याशिवाय, चीन अमेरिकन संरक्षण विभागाच्या निधीतून चालणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुप्त गुंतवणूक करून नव्या तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळवत आहे.