वॉशिंग्टन,
JD Vance : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी त्यांच्या भारतीय-अमेरिकन पत्नी उषा व्हान्स यांच्याबद्दल केलेल्या विधानाने वाद निर्माण झाला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "मला मनापासून वाटते की माझी पत्नी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारेल."
जेडी व्हान्स यांनी २०१९ मध्ये कॅथोलिक धर्म स्वीकारला. मिसिसिपीतील ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "माझी मुले ख्रिश्चन संगोपनात वाढली आहेत आणि ख्रिश्चन शाळेत शिकतात. माझी पत्नी उषा, जी हिंदू पार्श्वभूमीतून आली आहे, ती आता रविवारी माझ्यासोबत चर्चला जाते. मला आशा आहे की ती एके दिवशी कॅथोलिक चर्चच्या प्रभावात येऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारेल."
व्हान्स यांनी पुढे स्पष्ट केले, "मला माझ्या पत्नीनेही ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवावा असे वाटते. पण जर ती तसा निर्णय घेतला नाही, तर ते तिचे स्वातंत्र्य आहे." त्यांनी हेही म्हटले की, "ख्रिश्चन मूल्ये ही अमेरिकेच्या संस्कृतीचा पाया आहेत आणि त्याबद्दल मला माफी मागायची गरज नाही."
हे विधान H-1B व्हिसा आणि भारतीय समुदायावर वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आले आहे. अलीकडेच, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल भारतीय वंशाचे काश पटेल आणि तुलसी गॅबार्ड यांना अमेरिकन वापरकर्त्यांनी ट्रोल केले होते. काहींनी "भारताला जा" किंवा "येशूला शोधा" असे वादग्रस्त प्रतिसाद दिले.
व्हान्स यांच्या वक्तव्याला काही रूढीवादी प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला, तर सामाजिक माध्यमांवर यावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.