कोंबड बाजारावर गुन्हे शाखेची धाड; ५ जणांना अटक

*६ कोंबड्यांसह ३.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
सेलू, 
Kombad Bazaar : कोंबड्यांची झूंज लावून त्यावर जुगार खेळणार्‍या कोंबड बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून ६ कोंबड्यांसह ३ लाख ३६ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवार २९ रोजी तालुयातील हिवरा (साखरा) येथे करण्यात आली. या कारवाई पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
 
 
 
JK
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना हिवरा (साखरा) येथे कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे गुन्हे शाखेच्या तीन पथकाने हिवरा (साखरा) परिसरातील धाम नदीकाठ गाठला. त्यावेळी काही इसम कोंबड्यांच्या पायांना लोखंडी कात्या बांधून त्यांची आपसात झूंज लावून त्यावर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पथकाने जुगार्‍यांना घेराव घातला. यावेळी काही इसम त्यांच्या ताब्यातील दुचाकी जागीच सोडून पळून गेले तर सूरज पवार (३८) रा. हमदापूर, सुनीलदास पवार (४४) रा. हमदापूर, रविंद्र उईके (४०) रा. दिंदोडा (मदनी), पुजाराम तुमडाम (७८) रा. कोटंबा व निकेश लोटे (३७) रा. तरोडा या पाच जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून सहा कोंबडे, कोंबड्यांच्या झुंजीकरिता वापरण्यात येणारे साहित्य, जुगारातील रोख रकम, चार मोबाईल, सहा दुचाकी असा ३ लाख ३६ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सिंदी (रेल्वे) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, अंमलदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, शेखर डोंगरे, भूषण निघोट, अमर लाखे, धर्मेंद्र अकाली, अमरदिप पाटील, अमोल नगराळे, मंगेश चावरे, विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राऊत आदींनी केली.