रा. सू. गवईंच्या कार्याचा शासनाकडून गौरव

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन -पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे थाटात लोकार्पण

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
अमरावती, 
Devendra Fadnavis : रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे कार्य मार्गदर्शक ठरावेत, तसेच त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी स्मारक आणि सर्वकष वाटचालीचा दस्तावेज तयार करण्यासाठी संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही प्रकल्पातून त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
 
 
AMT
 
दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे गुरूवारी दुपारी उद्घाटन केल्यानंतर स्मारकस्थळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरन्यायाधिश भूषण गवई यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण झाले. यावेळी कमलताई गवई, उपमुख्यमंत्रिद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अ‍ॅड. आशिष जयस्वाल, खा. डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आ. किरण सरनाईक, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, डॉ. राजेंद्र गवई, चरणसिंग ठाकूर, चैनसूख संचेती, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र उपस्थित होते.
 
 
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रा. सू. गवई यांच्या अंगी विनयशिलता, नम्रता आणि शालिनता होती. त्यांना भेटल्यानंतर ऊर्जा जाणवायची. त्यांनी चळवळ जीवंत ठेवण्याचे काम केले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, येत्या कालावधीत रा. सू. गवई यांचे जन्मशताब्दी वर्ष येणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात यावेत, अशी सूचना केली. दादासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वांशी उत्तम समन्वय साधला. आमदार, खासदार, राज्यपाल म्हणून त्यांची राजकीय वाटचाल दीर्घकाळ राहिली. उत्कृष्ट वक्तृवाने त्यांनी नेतृत्व आणि कर्तृत्व घडविले असल्याचे सांगितले. स्मारकाच्या कामात योगदान देणार्‍याता यावेळी सत्कार करण्यात आला. स्मारकाच्या दर्शनी भागावरील दादासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी स्मारकाची पाहणी केली. कार्यक्रमात दादासाहेब गवई यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविण्यात आली. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.
 
 
स्मारक विद्यार्थांसाठी उपयुक्त ठरेल : न्या. गवई
 
 
न्या. गवई यावेळी म्हणाले, रा. सू. गवई यांचे स्मारक पूर्ण होणे ही एक स्वप्नपूर्ती आहे. स्मारकाची पायाभरणी ते उद्घाटन ही कामे गतीने करण्यात आली आहे. या वास्तूचा लाभ नागरिकांना होणार आहे. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, हा दृष्टीकोन ठेवून स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकात जीवनपट दर्शविताना कल्पकता ठेवली आहे. त्यामुळे स्मारक हे सर्वांग सुंदर झाले आहे. समाजाने दिलेल्या आशीर्वादाने वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य घटकांचे प्रश्न सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नुकताच झुडपी जंगलाचा प्रश्न सोडविण्यात आला असून याचा असंख्य शाळा, महाविद्यालय, तसेच नागरिकांचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे त्यांनी सांगितले.