...आणि महाराष्ट्रात बनले डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Donald Trump's Aadhaar card राज्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून मतदार नोंदणी केल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या घटनेमुळे सायबर गुन्ह्यांबाबत आणि निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी १६ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत एका वेबसाइटद्वारे बनावट आधार कार्ड कसे तयार केले जात आहेत आणि त्या आधारे मतदार नोंदणी कशी केली जात आहे, हे दाखवले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
 

Donald Trump 
यानंतर भाजपच्या सोशल मीडिया सेलचे सह-संयोजक धनंजय वागस्कर यांनी या प्रकरणावर गंभीर दखल घेतली आणि संबंधित वेबसाइटचा निर्माता, मालक आणि वापरकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, अशा प्रकारच्या वेबसाइटमुळे भारताच्या स्वायत्त संस्थांबद्दल आणि एका राजकीय पक्षाबद्दल जनतेत द्वेष आणि अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी तपास सुरू करताना दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, बनावट वेबसाइटच्या माध्यमातून आधार कार्ड तयार करून समाजात गोंधळ आणि तणाव निर्माण करण्याचा कट रचला गेला होता.दरम्यान, रोहित पवार यांनी मागील लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बनावट मतदारांची नोंदणी आणि खऱ्या मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला होता. त्यांनी सांगितले की, २०१९ ते २०२४ या काळात ३२ लाख नवीन मतदार जोडले गेले असताना केवळ सहा महिन्यांत ४८ लाख मतदारांची भर पडली, ही बाब गंभीर आहे.सध्या पोलिसांनी संबंधित वेबसाइट आणि तिच्या ऑपरेटरचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला असून, या बनावट मतदार घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.