शेतकरी नेत्यांची सरकारसोबत निर्णायक बैठक आज!

कर्जमाफी, बोनस आणि हमीभावावर होणार चर्चा

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Farmer leaders meeting today नागपूरमध्ये प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अखेर तोडगा निघण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी राज्य सरकारसोबत चर्चा करण्यास सहमती दर्शविली असून, ते यासाठी आज मुंबईत दाखल होत आहेत.
 
 
Farmer leaders meeting today
 
या संदर्भात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. शेतकरी नेत्यांकडून बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि अजित नवले हे उपस्थित राहून सरकारसोबत वाटाघाटी करतील. ही बैठक उच्चस्तरीय असल्याने मुख्य सचिवांसह विविध विभागांचे तब्बल ३० वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत.
 
 
या बैठकीत ७ एप्रिल रोजी बच्चू कडू यांच्यासोबत झालेल्या चर्चेतील निर्णयांवरील कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार असून, नव्या मागण्यांवरही विचारविनिमय होईल. विशेष म्हणजे, आजच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बच्चू कडू म्हणाले, “सर्व शेतकरी नेते एकत्र आले, हे आंदोलनाचे मोठं यश आहे. आम्ही एकत्र आलो की शेतकऱ्यांना बळ मिळतं आणि ते आत्महत्येचा विचार करत नाहीत.
आजच्या बैठकीत कर्जमाफी, पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंद्र, २० टक्के बोनस आणि हमीभाव याबाबत सविस्तर चर्चा होईल. मात्र तोडगा निघाला नाही, तर नागपूरला परतल्यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवू.” दरम्यान, बच्चू कडू यांच्या मुंबई भेटीवर त्यांचे मोठे बंधू बाळू बाबाजीराव कडू यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमचा लहान भाऊ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला जात आहे. तो शेतकऱ्यांच्या हिताचा आणि कर्जमुक्तीचा निर्णय घेऊनच परत यावा, अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या आईने त्याला शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आयुष्य द्यावं असं सांगितलं होतं. आम्हीही त्याला कधी कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी रोखलं नाही. बच्चू कडू आमच्या घरातून शेतकऱ्यांच्या लढ्यासाठीच दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता संध्याकाळच्या या बैठकीकडे लागले आहे. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरेल का, हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.