५०४ जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

-जन्म प्रमाणपत्रांसाठी दिली बनावट कागदपत्रे -राज्यातली पहिलीच घटना

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
अमरावती, 
Fraud charges filed : जन्म व मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप करुन काही पुरावे भाजपा नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी मनपाला दिले होते. दरम्यान, अमरावती शहरातील अनेकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवल्याचे मनपाच्या वैद्यकिय आरोग्य अधिकार्‍याने दिलेल्या तक्रारीतून आता पुढे आले आहे. त्यामुळेच या प्रकरणात शहरातील कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री तब्बल ५०४ जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बनावट जन्म - मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणात एकाचवेळी इतक्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना आहे.
 
 
J
 
मनपाचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी या प्रकरणात पोलिसात तक्रार दिली आहे. २०२३ ते जानेवारी २०२५ या काळात अमरावती तहसीलमध्ये ४ हजार ६३८ जणांनी जन्म - मृत्यू प्रमाणपत्राची अर्जाव्दारे मागणी केली होती. त्यापैकी ४२ अर्ज रद्द करण्यात आले होते. याचवेळी २ हजार ८९६ मंजूर झाले होते. २८९६ पैकी सुमारे १८०० दाखले हे मनपाच्या हद्दीत देण्यात आले होते. दरम्यान २५ जानेवारी २०२५ रोजी शासनाने ‘जीआर’ काढून २०२३ ते २०२५ या काळात देण्यात आलेले सर्व जन्म - मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले. रद्द झालेले सर्व प्रमाणपत्र संबधित यंत्रणेकडे परत करण्याचे आदेशसुध्दा देण्यात आले होते. मनपा हद्दीत या आदेशाचे पालन करुन सुमारे ११०० जणांनी केले. मात्र उर्वरित सातशे जणांनी अजूनही दाखले मनपाकडे परत केले नाही. त्यामुळे मनपाने पथकाव्दारे दाखले परत न करणार्‍यांचा शोध घेतला. त्यावेळी १५५ जण दिलेल्या पत्त्यांवर मिळाले नाही तर ३४९ जणांचे पत्तेच मिळाले नाहीत. त्यामुळे मनपाने अशा ५०४ जणांविरुध्द तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
 
 
त्यांचा शोध घेणार
 
मनपा अधिकार्‍यांच्या तक्रारीवरुन ५०४ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ज्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही तपास सुरू केला आहे. यामध्ये आरोपी संख्येत वाढ होवू शकते.
-दशरथ आडे
एपीआय व तपास अधिकारी