नाफेडला मुहूर्त सापडे ना, शासकीय खरेदी केंद्र बंदच

१५ हजार शेतकर्‍यांनी केली सीसीआयकडे नोंदणी

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
वर्धा,
Government procurement center closed नैसर्गिक संकटामुळे यावर्षी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. हमीभावात शेतकर्‍यांचे सोयाबीन नाफेड खरेदी करते. पण, आतापर्यंत नाफेडला साध्या नोंदणी सुरू करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याने हमी भावापेक्षा कमी भावात शेतकर्‍यांना सोयाबीन खाजगी व्यापार्‍यांना विकावे लागत आहे. जिल्ह्यातील सुमारे १५ हजार शेतकर्‍यांनी आतापर्यंत सीसीआयला कापूस विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. पण, प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू झाली नसल्याने कापूस उत्पादकांच्या अडचणी कायम आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे उत्पादन घेतात. मात्र, यावर्षी वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीचा पिकांना चांगलाच फटका बसला. साधा मळणीचा खर्चही निघणार नाही हे लक्षात आल्यावर शेतकर्‍यांना थेट सोयाबीन पिकाला आगीच्या स्वाधीन करावे लागले. तर कपाशी पिकावर काही भागात लाल्या तर कुठे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
 

Government procurement center closed 
 
 
दरम्यान, गुरुवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आणखी काही दिवस पावसाची शयताही हवामान विभागाने वर्तविली आहे. अवकाळी पावसाचा जोर कायम राहिल्यास कपाशीची मोठ्या प्रमाणात बोंडसड होण्याची शयता शेतकर्‍यांकडून वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत शेतमालाला किमान हमीभाव तरी मिळावा या हेतूने तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचे आहे. तशी मागणीही शेतकर्‍यांकडून केली जात आहे. जिल्ह्यातील १३ केंद्रांवरून शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करण्याचा मानस सीसीआयचा आहे. त्यासाठी नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १५ हजार शेतकर्‍यांनी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. ३१ ऑटोबर ही सीसीआयने नोंदणीसाठी दिलेली अंतिम मुदत आहे.
 
 
गतवर्षी सीसीआयने खरेदी केला होता ९ लाख विंटल कापूस
मागीलवर्षी सीसीआयने शेतकर्‍यांचा सुमारे ९ लाख विंटल कापूस खरेदी केला होता. यंदा १३ केंद्रांवरून कापूस खरेदी करण्याचा मानस सीसीआयचा आहे. देवळी, वायगाव (नि.), सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा (घा.), पुलगाव, समुद्रपूर, हिंगणघाट, वडनेर, शिरपूर, उमरी (आंजी), रोहणा (खरांगणा) या सीसीआयच्या कापूस केंद्रांसाठी सध्या शेतकर्‍यांकडून नोंदणी करून घेतली जात आहे.