महाराष्ट्र हादरला...१७ मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य ठार

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
मुंबई.
Hostage taker Rohit Arya killed राजधानी मुंबईतील पवई परिसरात घडलेल्या एका थरारक आणि धक्कादायक घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीचा अखेर पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यने आधी पोलिसांवर गोळी झाडली, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, ज्यात त्याच्या छातीत गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी पवईतील एल अँड टी बिल्डिंगजवळील आरए स्टुडिओमध्ये घडली. सध्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांना प्रशिक्षण, ऑडिशन किंवा कोर्ससाठी पाठवले होते. त्याच पार्श्वभूमीवर या स्टुडिओत काही दिवसांपासून वेब सिरीजसाठी ऑडिशन घेतली जात होती. गुरुवारी दुपारी मुलांना जेवणासाठी थांबवण्यात आल्यानंतर रोहित आर्यने अचानक स्टुडिओच्या खोलीचे दार बंद केले आणि १५ वर्षांखालील १७ मुले व दोन पालकांना ओलीस ठेवले.
 
 
Hostage taker Rohit Arya killed
 
या घटनेची माहिती मिळताच पवई पोलिस, अग्निशमन दल आणि एनएसजी कमांडो घटनास्थळी दाखल झाले. जवळपास दोन तास तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी आर्यशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकत सांगितले की, “मी दहशतवादी नाही, मला फक्त काही लोकांशी बोलायचं आहे, प्रश्न विचारायचे आहेत. मला पैशांची मागणी नाही” त्याने असेही म्हटले की, मी आत्महत्या न करता या मार्गाने लक्ष वेधत आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कौशल्याने योजना आखली. बाथरूममधून प्रवेश करत पोलिसांनी आतमध्ये प्रवेश मिळवला आणि सर्व मुलांची सुरक्षित सुटका केली. या दरम्यान, आर्यने पोलिसांवर गोळी झाडली आणि प्रत्युत्तरात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी गोळी झाडली. त्यात आर्य गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. रोहित आर्यने संपूर्ण घटना अत्यंत नियोजनपूर्वक आखली होती. पोलिसांच्या प्रवेशावर नजर ठेवण्यासाठी त्याने खिडक्यांना सेन्सर्स बसवले होते. मात्र, पोलिसांनी त्याला फसवून आत प्रवेश केला आणि मोठा अनर्थ टळवला.
 
 
पोलिस तपासात उघड झालं आहे की, आर्य शिक्षण विभागाच्या प्रकल्पात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मानसिक तणावात होता. शालेय शिक्षण विभागाच्या “स्वच्छता मॉनिटर” या प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे होते. त्याने या प्रकल्पावर सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च केला, पण त्यातील ४५ लाख रुपये अद्याप विभागाकडून मिळाले नाहीत, असा त्याचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर तो गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत होता आणि काही दिवसांपूर्वी उपोषणालाही बसला होता. घटनेदरम्यान दोन जण एक ज्येष्ठ महिला आणि एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व १७ मुले मात्र सुखरूप आहेत. त्यांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुले या घटनेनंतर घाबरलेली आहेत, पण सुरक्षित आहेत. या घटनेने केवळ मुंबई नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले आहे. शिक्षण, प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेकडे अनेक प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा वळले आहेत. अखेर पोलिसांच्या शौर्याने आणि तातडीच्या कारवाईमुळे १७ निरपराध मुलांचे जीव वाचले, पण एका असंतुष्ट माणसाच्या मानसिक तणावाने राज्याला हादरवून सोडले.