भारताची पहिली स्वदेशी ड्रायव्हरलेस कार साकार!

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
India's first indigenous driverless car एलन मस्क यांच्या टेस्लाप्रमाणेच भारतातही आता ड्रायव्हरलेस कारची नवी क्रांती घडताना दिसत आहे. टेस्लाने नुकतीच भारतात दोन शोरूम्स एक मुंबईत आणि दुसरे दिल्लीत सुरू केली आहेत, आणि त्याचवेळी भारतीय तंत्रज्ञानक्षेत्रातही एक मोठं यश मिळालं आहे. कारण भारताची पहिली स्वदेशी ड्रायव्हरलेस कार अखेर तयार झाली आहे. ही कार तयार केली आहे विप्रो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) आणि आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त उपक्रम WIRIN (Wipro-IISc Research and Innovation Network) ने. बेंगळुरूमध्ये झालेल्या एका समारंभात या कारचे अनावरण करण्यात आले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर या कारचा २८ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात कार पूर्णपणे ड्रायव्हरशिवाय रस्त्यावर धावताना दिसते. व्हिडिओमध्ये उत्तराडी मठाचे सत्यात्मा तीर्थ श्रीपादंगलू कारमध्ये बसलेले दिसतात.
 
India
 
ही ड्रायव्हरलेस कार नुकतीच आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या परिसरात सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विप्रोचे ग्लोबल हेड (ऑटोनॉमस सिस्टम्स अँड रोबोटिक्स) रामचंद्र बुधिहाल यांनी भूषवले, तर राष्ट्रीय शिक्षा समिती ट्रस्ट (RSST) चे अध्यक्ष एम.पी. श्याम आणि आरव्हीसीईचे प्राचार्य के.एन. सुब्रमण्यम उपस्थित होते. या नव्या कारच्या निर्मितीमागे सहा वर्षांची मेहनत आणि संशोधन दडलेले आहे. आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील प्राध्यापक उत्तरा कुमारी आणि राजा विद्या यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या टीमने पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून ही कार विकसित केली आहे.
 
ही कार आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून, सेन्सर्स, कॅमेरे, रडार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यांच्या साहाय्याने ती स्वतःभोवतालचा परिसर ओळखते, निर्णय घेते आणि मानवी हस्तक्षेपाविना स्वतः चालते. ती वेग, दिशा आणि ब्रेक यांचे नियमन पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करते. भारतातील ही पहिली ड्रायव्हरलेस कार केवळ तांत्रिक यश नाही, तर ‘मेड इन इंडिया’ नवोपक्रमाचे एक महत्त्वाचे प्रतीक ठरते. आता ही कार व्यावहारिक वापरासाठी तयार करण्याच्या पुढील टप्प्यात जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.