कामठी नगरपरिषदेतील माजी मुख्याधिकारी व माजी अध्यक्षांना अंतरिम जामीन

निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरणात उच्च न्यायालयाचे निर्देश

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Kamthi Municipal Council, कामठी नगरपरिषदेतील कंत्राटी कामांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी मुख्याधिकारी संदीप बोरकर आणि माजी नगराध्यक्ष मोहम्मद सहजहान अहमद यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रजनीश आर. व्यास यांनी हा आदेश दिला. या दोघांविरुद्ध कामठी (जुनी) पोलिस ठाण्यात कलम १२०-बी, १६६, १८२, २०१, २१२, २१८, ४०९, ४६८ आणि ४७१ भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीने नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, २५ जून २०२१ रोजीच्या आपल्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीत कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत, असे स्पष्ट केले होते.

Kamthi Municipal Council, 
न्यायालयात सुनावणीदरम्यान संदीप बोरकर यांनी सांगितले की, तक्रारदाराविरुद्ध त्यांनी फसवणुकीचा (कलम ४२० भादंवि) गुन्हाही दाखल केला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश तक्रारदाराने आव्हान दिलेला नाही, हेही न्यायालयाच्या नोंदीत आले. न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले की, या प्रकरणात तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे दोघांना प्रत्येकी ₹२५ हजार रुपयांच्या जामिनावर अंतरिम संरक्षण देण्यात आले आहे. त्यांना चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य करणे आणि कोणत्याही साक्षीदारावर दबाव न आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.