नवी दिल्ली,
Lucknow in search of Indian coach आयपीएल २०२६ हंगामापूर्वी मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग लखनऊ सुपर जायंट्सचा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. आयपीएलमधील आगामी मिनी लिलावाच्या पार्श्वभूमीवर काही संघ आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहेत, आणि त्याचाच एक भाग म्हणून लखनौ फ्रँचायझी युवराज सिंगसोबत चर्चा करत असल्याचे समजते.

एका अहवालानुसार, सध्या ही चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. तथापि, फ्रँचायझी विद्यमान प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना बदलण्याचा विचार करत आहे. लँगर यांनी स्थानिक खेळाडूंशी आवश्यक समन्वय आणि संवाद प्रस्थापित करण्यात अपयश आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सलग दोन परदेशी प्रशिक्षकांनंतर आता भारतीय प्रशिक्षकाला संधी देण्याचा निर्णय फ्रँचायझीने घेतल्याचे वृत्त आहे. युवराज सिंगला प्रशिक्षणाचा अधिकृत अनुभव नसला, तरी त्याने वैयक्तिक पातळीवर अनेक तरुण खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. विशेषतः टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि पंजाबचा सलामीवीर अभिषेक शर्मा यांना युवराजने आपल्या प्रशिक्षणाखाली विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्याच्या प्रशिक्षक म्हणून निवडीबद्दल चाहत्यांमध्ये आणि तज्ज्ञांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
जर युवराज सिंगची नियुक्ती झाली, तर लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा मोठा बदल ठरणार आहे. कारण केवळ चार हंगामांमध्ये संघ दुसऱ्यांदा मुख्य प्रशिक्षक बदलणार आहे. यापूर्वी अँडी फ्लॉवर पहिल्या दोन हंगामांसाठी मुख्य प्रशिक्षक होते, त्यानंतर लँगरची नियुक्ती झाली होती. शिवाय, अलीकडेच फ्रँचायझीने माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला कोचिंग स्टाफमधून बाजूला केले होते. या पार्श्वभूमीवर युवराज सिंग लखनऊ सुपर जायंट्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आयपीएल २०२६ हंगामापूर्वी हा निर्णय संपूर्ण लीगमधील चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.