नागपूर,
MBBS महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य सीईटी सेलने एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करताना २२० विद्यार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. या विद्यार्थ्यांनी चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे सादर केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सीईटी सेलच्या माहितीनुसार, १७० विद्यार्थ्यांनी चुकीची कागदपत्रे अपलोड केली, तर ५० विद्यार्थ्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना केवळ सद्य फेरीतच नव्हे, तर भावी प्रवेश फेऱ्यांमधूनही वगळण्यात आले आहे. या तिसऱ्या फेरीत राज्यभरात एकूण १,७६४ जागा रिक्त असून, त्यापैकी ७८९ एमबीबीएस आणि ९७५ बीडीएस जागांचा समावेश आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १६८ एमबीबीएस आणि ६० बीडीएस, तर खाजगी संस्थांमध्ये ६२१ एमबीबीएस आणि ९१५ बीडीएस जागा उपलब्ध आहेत.
नागपूरसह विदर्भातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतही या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि शासकीय दंत महाविद्यालयातील काही जागा अद्याप रिक्त असल्याचे सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १७१ विद्यार्थ्यांना चुकीच्या कागदपत्रांबाबत नोटीस पाठवण्यात आली होती. त्यापैकी फक्त एक विद्यार्थ्याने आवश्यक दुरुस्ती करून योग्य कागदपत्रे सादर केली. उर्वरित १७० विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले. तसेच १०८ विद्यार्थ्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नव्हती, त्यापैकी ५८ विद्यार्थ्यांनी नंतर प्रतिसाद दिला, मात्र उर्वरित ५० विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी वगळण्यात आले. सीईटी सेलने विद्यार्थ्यांना इशारा देताना सांगितले की, दस्तऐवज सादरीकरणाचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक आहे. चुकीची किंवा बनावट माहिती दिल्यास भविष्यातील सर्व प्रवेश संधी गमावल्या जाऊ शकतात. या तिसऱ्या फेरीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांनी दिनांक ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान संबंधित महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश सीईटी सेलने दिले आहेत.
महत्त्वाची आकडेवारी
एकूण रिक्त जागा 1764
एमबीबीएस 789
बीडीएस 975
अपात्र विद्यार्थी 220
चुकीची कागदपत्रे 170
कागदपत्रे न सादर करणारे 50