हैदराबाद,
Mohammad Azharuddin new innings भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि काँग्रेसचे नेते मोहम्मद अझहरुद्दीन यांना तेलंगणा सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात येणार आहे. तेलंगणा विधान परिषदेचे सदस्य असलेले अझहरुद्दीन हे उद्या, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ठरणार आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ११ नोव्हेंबर रोजी जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अझहरुद्दीन यांना मंत्री करण्यात येत असल्याचे बोलले जाते. या मतदारसंघात सुमारे ३० टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुस्लिम समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही रणनीती आखल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
संग्रहित फोटो
सध्या तेलंगणाच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम आमदार नाही. त्यामुळे अझहरुद्दीन यांची मंत्री म्हणून नियुक्ती केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे तर सामाजिक प्रतिनिधित्वाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. या निर्णयातून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सरकार राज्यातील मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व देत असल्याचा संदेश देत आहे. आमदार गोपीनाथ यांच्या निधनानंतर जुबली हिल्स पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. बीआरएसकडून मंगंती सुनीता गोपीनाथ, काँग्रेसकडून वल्लाला नवीन यादव आणि भाजपकडून लंकला दीपक रेड्डी हे उमेदवार रिंगणात आहेत. तिन्ही प्रमुख पक्षांनी मुस्लिम उमेदवार न दिल्याने काँग्रेसने अझहरुद्दीन यांना मंत्री बनवून मुस्लिम समाजातील मतदारांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
या मतदारसंघात सुमारे ३.९० लाख मतदार असून त्यापैकी १.२० ते १.४० लाख मतदार मुस्लिम समाजातील आहेत. निवडणुकीत मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. त्यामुळे काँग्रेसच्या या राजकीय खेळीचा किती फायदा होतो, हे आगामी निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. अझहरुद्दीन यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर तेलंगणा कॅबिनेटमधील मंत्र्यांची संख्या १६ होईल. राज्यात कमाल १८ मंत्री होऊ शकतात. क्रिकेट मैदानावर आपली नेतृत्वक्षमता दाखवणारे अझहरुद्दीन आता राजकारणात ‘नवी इनिंग’ खेळताना दिसणार आहेत.