नागपूर,
Nagardhan Fort रामटेक येथील सीएसी ऑलराउंडर या साहसी शिबिराच्या उपक्रमांतर्गत आयोजित शैक्षणिक सहलीत सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमाननगरच्या विद्यार्थ्यांनी नगरधन किल्ला आणि मनसर उत्खनन स्थळाला भेट दिली.

वाकाटक राजवंशाच्या वैभवशाली इतिहासाचे केंद्र असलेला नगरधन किल्ला हा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक किल्ल्याचा समृद्ध इतिहास जाणून घेतला आणि परिसराचे निरीक्षण करत भारतीय वारशाविषयी उत्सुकता व्यक्त केली. या एकदिवसीय हेरिटेज टूर चे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरचा अनुभवाधारित शिक्षणाचा परिचय करून देणे हे होते. एकूण १८ विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीत उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी मनसर उत्खनन स्थळावर प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली आणि पुरातत्त्वीय वारशाचे संवर्धन किती आवश्यक आहे, हे समजून घेतले. दौऱ्याचा समारोप “ऐतिहासिक स्मारकांचे संवर्धन आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व” या विषयावरील संवादात्मक चर्चासत्राने झाला. या सत्रात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि निरीक्षणे मांडली. या वेळी सेंटर पॉइंट स्कूलच्या उपप्राचार्या जयती चक्रवर्ती आणि बिना सॅम्युअल उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना या सहलीदरम्यान सीएसी ऑलराउंडर चे संचालक अमोल खंते, अजय गायकवाड, मनीष माख आणि तुषार काले यांचे मार्गदर्शन लाभले. या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख तसेच वारसा जतनाचे भान मिळाले.