नवी दिल्ली,
new cyclone will arrive in November ‘मोंथा’ या विनाशकारी चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अपडेटनुसार, बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे. या आठवड्याच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला हवामानात मोठा बदल घडू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल, तर १ नोव्हेंबर रोजी थायलंडजवळील पूर्व बंगालच्या उपसागरात दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. हे प्रणाली पश्चिमेकडे सरकत आंध्र प्रदेशच्या गुंटूर किनाऱ्याजवळ पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान तज्ञांच्या मते, हे कमी दाबाचे क्षेत्र पूर्णपणे विकसित झाल्यानंतरच त्याची अचूक दिशा सांगता येईल. ते चक्रीवादळात रूपांतरित होईल की नाही हे अद्याप निश्चित नाही. तरीसुद्धा नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, ‘मोंथा’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये मोठा विध्वंस घडवला होता. मंगळवारी रात्री उशिरा वादळाने काकीनाडाच्या दक्षिणेकडे किनाऱ्यावर सुमारे ११० किमी प्रतितास वेगाने धडक दिली. आंध्र प्रदेशात या वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, भूस्खलन झाले आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. ‘मोंथा’ आता कमी दाबाच्या क्षेत्रात कमकुवत झाले असून सध्या ते छत्तीसगडकडे ४५ किमी प्रतितास वेगाने सरकत आहे. आजपर्यंत (३० ऑक्टोबर) ते छत्तीसगडला पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तेलंगणात अधूनमधून पाऊस आणि ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशात अजूनही जनजीवन पूर्णपणे सुरळीत झालेले नाही.
गजपती जिल्ह्यातील भूस्खलनामुळे दक्षिण ओडिशातील लोकांना मोठी गैरसोय झाली आहे. तसेच गुंटूर, एनटीआर, बापटला (आंध्र प्रदेश) आणि गजपती (ओडिशा) जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था ३० ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही हवामानात मोठे चढ-उतार दिसू शकतात आणि पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.