एका बटण आणि उठेल ‘अणु प्रलय’

पुतिनचा पोसायडॉन जगाला हादरवणार!

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
मॉस्को,
Putin's Poseidon will shake रशियाने जगाला पुन्हा एकदा हादरवून सोडले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अणु-सक्षम सुपर टॉर्पेडो “पोसायडॉन”च्या यशस्वी चाचणीची घोषणा केली आहे. हे शस्त्र केवळ एक टॉर्पेडो नाही, तर अणुशक्तीवर चालणारे स्वायत्त पाण्याखालील वाहन आहे, जे समुद्राच्या १,००० मीटर खोलीवरून ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने हालचाल करू शकते. एका बटणाच्या दाबाने हा यंत्रमानव महासागरातून उभा राहतो आणि “अणु त्सुनामी”च्या रूपाने शहरे उद्ध्वस्त करण्याची क्षमता दाखवतो.
 
Putin
 
 
पोसायडॉनच्या विकासाचा उद्देश पारंपारिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना निष्प्रभ करणे आणि विनाशाचा एक नवा प्रकार निर्माण करणे हा आहे. रशियन माध्यमांनुसार, हे शस्त्र कोबाल्ट-६०सारख्या जड अणुघटकांनी सज्ज असू शकते, ज्यामुळे केवळ स्फोटच नव्हे तर महासागरातून प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्गही पसरेल. या विकिरणामुळे किनारी भाग कायमचे राहण्यायोग्य राहणार नाहीत आणि समुद्री जीवन, पर्यावरण व मानव आरोग्यावर विनाशकारी परिणाम होतील.
 
 
तज्ञांच्या मते, पोसायडॉन हे केवळ लष्करी हत्यार नसून मानवी सभ्यतेसाठी धोक्याची नवी व्याख्या आहे. या टॉर्पेडोमुळे निर्माण होणाऱ्या “अणु त्सुनामी”मुळे समुद्रकिनाऱ्यावरील संपूर्ण शहरे काही क्षणांत जलमग्न होऊ शकतात. त्यानंतर उरते ते फक्त किरणोत्सर्ग आणि मृत्यूसमान शांतता. रशियाचा दावा आहे की पोसायडॉन हे प्रतिशोधात्मक शस्त्र आहे. म्हणजेच, जर शत्रूने अणुहल्ला केला तर रशिया या महाशस्त्राचा वापर करेल. पण अनेक जागतिक विश्लेषक याला “डिटरन्स वेपन”, म्हणजेच भीती निर्माण करणारे प्रतिबंधक साधन, असे मानतात. याचा उद्देश थेट युद्ध नव्हे, तर विरोधकांच्या मनात भय निर्माण करून राजनैतिक फायदा मिळवणे हा आहे.
 
अमेरिकेने अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र करारातून माघार घेतल्यानंतर रशियाने आपले अणु संतुलन राखण्यासाठी अशा नवीन शस्त्र प्रणालींचा विकास वेगाने सुरू केला. “पोसायडॉन” हे त्या धोरणाचाच भाग असल्याचे मानले जाते. यामागे “वाढवणे ते कमी करणे” ही संकल्पना आहे. म्हणजे, नियंत्रित आण्विक शक्ती दाखवून शत्रूला दबावाखाली ठेवणे. पर्यावरणतज्ज्ञ आणि रणनीतिकार यावर गंभीर चिंता व्यक्त करत आहेत. कारण जर हे शस्त्र प्रत्यक्ष वापरले गेले, तर केवळ शत्रूराष्ट्र नाही तर संपूर्ण पृथ्वीचे सागरी पर्यावरण उद्ध्वस्त होईल. महासागरातील जैवविविधता, मत्स्यव्यवसाय आणि किनारी अर्थव्यवस्था दशकानुदशके पुनर्प्राप्त होऊ शकणार नाहीत.