यादगीर (कर्नाटक),
RSS in Karnataka काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या बालेकिल्ल्यात असलेल्या गुरमितकल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकातील यादगीर जिल्हा प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सशर्त परवानगी दिली असून, त्यामुळे राज्यात राजकीय वाद पुन्हा पेटला आहे. ही परवानगी आरएसएसचे जिल्हा प्रचार प्रमुख बसप्पा संजनोल यांच्या अर्जानंतर २३ ऑक्टोबर रोजी देण्यात आली. जिल्हाधिकारी हर्षल बोयल यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशानुसार मिरवणूक नरेंद्र राठोड लेआउटपासून सुरू होऊन सम्राट सर्कल, बसवेश्वर सर्कल, हनुमान मंदिर, कुंभारवाडी, मिलन चौक आणि सीहिनिरु बावी मार्केट मार्गे राम नगर येथे संपणार आहे.

प्रशासनाने या कार्यक्रमासाठी १० कठोर अटी घालून दिल्या आहेत. सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये, झाल्यास आयोजक जबाबदार राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मिरवणूक निश्चित मार्गावरच काढावी लागेल, धार्मिक किंवा जातीय भावना भडकवतील अशा घोषणा किंवा भाषणे करण्यास बंदी असेल. तसेच रस्ते अडवणे, दुकाने जबरदस्तीने बंद पाडणे किंवा शस्त्रास्त्र घेऊन सहभागी होणे सक्त मनाई आहे. कार्यक्रमादरम्यान पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.
या परवानगीमुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्षांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी व अनुदानित शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी आरएसएस शाखांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांच्या मते, आरएसएस तरुणांच्या मनात नकारात्मक विचार रुजवत आहे आणि त्यांच्यात धार्मिक विभाजन वाढवत आहे. त्यांच्या पत्रानंतर, राज्य मंत्रिमंडळाने आदेश काढला की कोणत्याही संघटनेने सरकारी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी परवानगी घ्यावी. त्याचबरोबर, आरएसएसच्या शाखांमध्ये सहभागी झाल्यामुळे काही सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते. आता, मल्लिकार्जुन खडगे यांच्या मतदारसंघातच आरएसएसला मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आल्याने राजकीय विरोधकांनी काँग्रेसवर दुहेरी भूमिकेचा आरोप केला आहे. दरम्यान, गुरमितकलच्या मिरवणुकीत स्वयंसेवकांना पारंपरिक काठ्या घेऊन सहभागी होण्यास परवानगी दिली जाईल की नाही, हे प्रशासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.