तभा वृत्तसेवा आर्णी,
Ajit Pawar, तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून, काँग्रेसचे आर्णी येथील दिग्गज साजिद बेग आणि माजी नगर परिषद सभापती अन्वर पठाण, शेखर खंदार, संजय व्यवहारे, युनुस शेख आपल्या असंख्य समर्थकांसह अप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईत राष्ट्रवादी भवन येथे उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
साजिद बेग आणि अन्वर पठाण यांच्या प्रवेशामुळे आर्णी तालुक्यात अप राकाँला मोठे बळ मिळाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
यावेळी बोलताना पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुका अप राकाँ स्वबळावर लढणार आहे. पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांसह, सर्व इच्छुक कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी दिली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
या पक्षप्रवेशामुळे आर्णी शहर व तालुक्यात अप राकाँचा प्रभाव निश्चितपणे वाढणार आहे. लवकरच पक्षाच्या नवीन शाखा उघडून संघटन अधिक मजबूत केले जाणार आहे. या प्रवेश सोहळ्यासाठी यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, आर्णी तालुकाध्यक्ष सुनील पोतगंटवार यांच्यासह तालुक्यातील राकाँचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत उपस्थित होते.
आर्णीला विकासाच्या वाटेवर नेऊ
आर्णी शहर व तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. आगामी नगर परिषद निवडणुकीत अप राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाल्यास, आर्णी शहराला विकासाच्या नव्या वाटेवर नेऊ, असा विश्वास साजिद बेग यांनी यावेळी व्यक्त केला.