अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान

*शेतकरी हवालदिल

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
चंद्रपूर, 
Unseasonal rains : हिवाळ्यात पावसाला जोर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास या अवकाळी पावसाने गोंधळ घातला. महानगरासह जवळपास सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. महानगराला तर तीन-चार तास पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसाने धान पिकासह कापूस, चना, सोयाबीन पिकांचे नुकसान केले आहे.त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. गुरूवारीही पावसाचे वातावरण कायम होते.
 
 
 
HJKH
 
 
 
गुरूवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण व सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू होता. तसेच कोरपना, वरोडा, नागभीड आदी तालुक्यात कापूस, चना, सोयाबिन या पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. पोंभुर्णा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरू आहे. या सततच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी शेतमाल सडण्याच्या मार्गावर आहे. विशेषतः धान कापणी हंगामात आलेल्या या अनिश्चित पावसामुळे हजारो शेतकर्‍यांचे कष्ट वाया गेले आहेत. पावसामुळे धान भिजून काळे पडले आहे. शेतकर्‍यांनी काही दिवसांपूर्वीच धान कापणी केली होती. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतातील बांध्यामध्ये जमा झाल्याने धान पूर्ण पाण्यात भिजले आहे. सततच्या पावसामुळे ऊभे पिक आडवे झाले आहे. अनेकांनी आपला माल शेतातच साठवून ठेवला होता. मात्र, अनपेक्षित पावसामुळे धान ओलाव्याने भिजले असून, त्यातून अंकुर फुटू लागले आहेत. त्यामुळे हे धान विक्रीयोग्य राहिलेले नाही. व्यापार्‍यांनीही या धानाला कमी दर देण्यास सुरुवात केली आहे.
 
 
सावली तालुक्यातील शेतकर्‍यांच्या धानपिकांचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही धान पिक कापणीला आले, तर काही निसवा झालेले आहे. या पावसाने शेतातील उभे धानपिक आडवे झाल्याने बळीराजासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पावसाने नुकसान झालेल्या धानपिक पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.
 
ब्रम्हपुरी तालुक्यातही धान पिकाचे नुकसान
 
ब्रम्हपुरी : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकर्‍यांनी चुरणा करून ठेवलेले धान पूर्णपणे सडून गेले आहे. अनेक ठिकाणी शेतातील कापलेल्या धानातील कडपा पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. खेड मक्ता येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किशोर लाडे यांनी शेतकर्‍यांच्या शेतावर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.