एकीचे बळ दाखवत शेतकऱ्यांचा महा एल्गार सोबत विजय-बच्चू कडू

प्रहारच्या आंदोलनामुळे सरकारला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नागपूर
Bachchu Kadu महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये जोरदार आंदोलन केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत सरकारने शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

bachoo kadu 
बच्चू कडू आणि अन्य शेतकरी नेते शुक्रवारी दुपारी नागपूर विमानतळावर पोहोचले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “सरकारने आम्हाला सहा महिन्यांचा वेळ मागितला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. कर्जमाफी न झाल्यास सरकारला सतत जाब विचारत राहू. आवश्यक असल्यास सरकारला सडो की पडू करू असेही आम्ही इशारा दिला आहे.”मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार, समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर करेल आणि शिफारशींचा अभ्यास करून ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यात येईल. याबाबत बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, “सरकारने वेळ मागितली आहे, मात्र याचा अर्थ आमचे आंदोलन थांबणार आहे असा नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाईपर्यंत आम्ही वारंवार आंदोलनाद्वारे सरकारला जाब विचारत राहणार आहोत.”
 
 
 
इशारा दिला
बच्चू कडू यांनी सरकारच्या कटकारस्थानाबाबतही इशारा दिला, “आश्वासन दिल्यानंतरही सरकारने कटकारस्थान केल्यास कोणालाही सोडणार नाही. जर परिस्थिती बिकट असेल आणि सरकारने वेळेत मार्ग काढला असता, तर ही वेळ आली नसती. शेतकऱ्यांसाठी सरकारची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे.”
 
 
 
यावेळी उपमुख्यमंत्री Bachchu Kadu अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली, मात्र बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, “राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे हे आम्हाला माहीत आहे, तरीही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे सरकारची जबाबदारी आहे. दरोडा घाला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे.”बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली झालेले हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी निर्णायक ठरले असून, नागपूरमध्ये त्यांच्या विजयाचे वातावरण आहे.नागपूरमध्ये केलेल्या भाषणात बच्चू कडू म्हणाले, “आमच्या मागे कार्यकर्ते आहेत. जे कार्यकर्ते प्रत्यक्ष नावासमोर येत नाहीत, त्यांचं कर्तृत्व प्रचंड मोठं आहे. ही लढाई तुम्ही जिंकली आहे. एकतेचं बल किती मोठं असते, हे दाखवून दिलं. पंजाबमध्ये १३ महिने आंदोलन चाललं, आम्ही फक्त तीन दिवसात हे साध्य केलं. ३१ वर्षांत हे सर्वात मोठं आंदोलन ठरलं. मेहनत, एकता आणि सामर्थ्य यामुळे आम्ही यश मिळवले.”बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर शेतकरी संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेचे स्वागत होत आहे.