सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारीपासून

- अंतिम वेळापत्रक जाहीर

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नागपूर, 
cbse exams केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ पासून घेतल्या जाणार असल्याचे गुरुवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा १० मार्चपर्यंत तर बारावीची परीक्षा ९ एप्रिल २०२६ पर्यंत पार पडेल. विशेष म्हणजे, सीबीएसईने यावेळी अंतिम तारीखपत्रिका तब्बल ११० दिवस आधीच जाहीर केली आहे. मंडळाच्या इतिहासात हा पहिलाच प्रसंग आहे. गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या प्राथमिक वेळापत्रकात काही बदल करून हे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
 
 
 
cbsc
 
 
अंतिम तारीखपत्रिकेत दहावीच्या परीक्षांसाठी एक अतिरिक्त दिवस वाढविण्यात आला असून, यंदा प्रथमच दहावीच्या परीक्षा दोन टप्प्यांत घेतल्या जाणार आहेत. दुसरा टप्पा १५ मे ते १ जून २०२६ दरम्यान होईल. या दुसऱ्या फेरीतील परीक्षा पर्यायी स्वरूपात असेल. म्हणजेच, इच्छुक विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्यासाठी ही संधी उपलब्ध राहील. दोन्ही फेऱ्यांतील परीक्षेत सहभागी झाल्यास विद्यार्थ्याचा सर्वोत्तम निकाल ग्राह्य धरला जाईल. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना पुरेसा अभ्यासाचा कालावधी मिळावा म्हणून विषयांमध्ये योग्य अंतर ठेवले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांच्या तारखांचा विचार करून वेळापत्रक तयार केले आहे, जेणेकरून बोर्ड व प्रवेश परीक्षा दोन्हींसाठी विद्यार्थ्यांना नियोजन सुलभ होईल.”
दहावीच्या अभ्यासक्रमात डेटा सायन्स, फ्रेंच, उर्दू, पंजाबी, बंगाली, तमिळ, रिटेल, सिक्युरिटी आणि ऑटोमोटिव्ह यांसारख्या विषयांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. तर बारावीतील बिझनेस स्टडीज, बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, सायकोलॉजी आणि अकाऊंटन्सी या विषयांच्या तारखांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.cbse exams संयम भारद्वाज यांनी स्पष्ट केले की, ४०,००० हून अधिक विषयांच्या संयोगांचा विचार करून वेळापत्रक तयार केले आहे, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचे दोन विषय एकाच दिवशी येऊ नयेत. तसेच, जेईई मेन आणि सीबीएसईच्या परीक्षांमध्ये तारखांचा गोंधळ होऊ नये म्हणून राष्ट्रीय परीक्षा संस्था विद्यार्थ्यांकडून अकरावीतील नोंदणी क्रमांक मागवणार आहे. त्यामुळे शाळांना आपल्या विद्यार्थ्यांना हा क्रमांक उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन्ही वर्गांच्या परीक्षा वार्षिक अभ्यासक्रमावर आधारित असतील आणि अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.