नागपूर,
Bachchu Kadu वर्धा महामार्गावर झालेल्या शेतकरी आंदोलनावरून राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि वामनराव चटप यांच्यासह सुमारे अडीच हजार आंदोलकांवर हिंगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्कजाम करून तब्बल ३० तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प ठेवल्याचा आणि पोलिसांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे.
 
२८ ऑक्टोबरपासून बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वर्धा महामार्गावर बसून आंदोलकांनी तीव्र आंदोलन छेडले. प्रशासनाने केंद्रीय कापूस खरेदी केंद्राजवळील मैदानात आंदोलनाची परवानगी दिली असतानाही आंदोलकांनी महामार्ग अडवून बसण्याचा मार्ग अवलंबला. परिणामी नागपूर-वर्धा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
 
 
कोर्टाच्या आदेशानंतरही आंदोलन थांबवण्यास बच्चू कडू यांनी नकार दिला. "लोक उठ म्हणतील तेव्हाच उठू," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे करून उपस्थितांना चिथावणी दिल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. याशिवाय, काही आंदोलकांनी पोलिसांशी वाद घालून अश्लील शिवीगाळ केल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत.हिंगणा पोलिसांनी या सर्व नेते आणि आंदोलकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत — बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक मार्ग अडवणे, नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणे — या गुन्ह्यांची नोंद केली आहे.या कारवाईमुळे शेतकरी आंदोलनाला मोठा धक्का बसला असून, प्रशासनाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.