मुंबई,
High Court  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कोणत्याही व्यक्तीला विशेषाधिकार किंवा हक्क सांगता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. या निर्णयामुळे अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी मराठी चित्रपट “पुन्हा शिवाजीराजे भोसले” प्रदर्शनाच्या मार्गावर कोणतीही अडचण राहिलेली नाही.
 
 
 
 या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपीने यापूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध दर्शवून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंपनीने “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” या पूर्वीच्या चित्रपटाशी तुलना करून स्वामित्त्व हक्कांचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप केला होता. तथापि, न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने कंपनीची याचिका फेटाळली. न्यायालयाने कंपनीच्या आरोपाला निराधार ठरवत, चित्रपटाच्या प्रदर्शनावर कोणतीही स्थगिती लावली जाऊ शकणार नाही, असेही स्पष्ट केले.न्यायालयाने म्हटले की, “छत्रपती शिवाजीराजे भोसले” किंवा “छत्रपती शिवाजी महाराज” या नावांवर कोणत्याही कंपनीला विशेषाधिकार नाही. महाराजांच्या नावावर कोणीही हक्क सांगू शकत नाही,” या मुद्द्यावर न्यायालयाने जोर दिला. तसेच, चित्रपटातील संवादांची नक्कल करण्यात आले असल्याचा दावा कंपनीने केला होता, परंतु न्यायालयाने तोदेखील फेटाळला. न्यायालयाच्या ठरावानुसार, चित्रपटातील संवाद नियमित असून ते मराठी भाषिकांमध्ये सामान्यतः वापरले जाणारे शब्द आहेत, तसेच मराठी साहित्य, नाटके आणि चित्रपटांचा भाग आहेत.
 
 
 
“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” हा High Court  चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या वेळी चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी आणि महेश मांजरेकर यांनी मेसर्स अश्वमी फिल्म्सच्या बॅनरखाली केली होती. यामध्ये एव्हरेस्टकडे ६० टक्के आणि मांजरेकरकडे ४० टक्के हक्क होते. पुढे २०१३ मध्ये आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात मांजरेकर यांनी आपले ४० टक्के हक्क एव्हरेस्टकडे हस्तांतरित केले. त्यामुळे एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट ही कंपनी “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” या चित्रपटाशी संबंधित सर्व बौद्धिक संपदा हक्कांची एकमेव मालक बनली होती.
 
 
 
न्यायालयाने या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून स्पष्ट केले की, पुन्हा शिवाजीराजे भोसले” हा चित्रपट पूर्णपणे नवीन आहे आणि तो पूर्वीच्या चित्रपटाचे अनुकरण नाही. मराठी चित्रपटांचे रसिक प्रेक्षक या शीर्षक किंवा अन्य कारणांमुळे गोंधळले जाणार नाहीत.”या निर्णयामुळे महेश मांजरेकर यांचे आगामी चित्रपट प्रदर्शित होण्यास मार्ग मोकळा झाला असून, मराठी चित्रपटप्रेमींना या चित्रपटाची प्रतिक्षा आता फळाला लागणार आहे.