जबलपूर,  
controversy-in-mp-over-school-order मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात असलेल्या प्रतिष्ठित अंजुमन इस्लामिया स्कूलच्या निर्णयामुळे सध्या मोठा वाद उसळला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने रविवारी सुट्टी न ठेवता शुक्रवारी म्हणजेच जुम्मेच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. हा निर्णय शाळेच्या वॉट्सअॅप गटातून पालकांना कळवण्यात आला, आणि यानंतर वादाला तोंड फुटले. प्रकरण इतके वाढले की आता त्यावर भाजपा आणि काँग्रेसमध्येही संघर्ष उभा राहिला आहे.
 
  
शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे की, शुक्रवारी नमाजच्या कारणामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी राहते. त्यामुळे शिकवणीला बाधा येत होती. या अडचणीवर उपाय म्हणून सुट्टीचा दिवस रविवारी ऐवजी शुक्रवारी ठेवण्याचा निर्णय घेतला. शाळेकडून पालकांना पाठवलेल्या संदेशात स्पष्ट सांगण्यात आले आहे की, आता प्रत्येक शुक्रवार शाळा बंद राहील आणि रविवारी नियमित वर्ग होतील.अंजुमन इस्लामिया ट्रस्टच्या अध्यक्षांनी सांगितले की, “दर शुक्रवारी नमाजच्या वेळेमुळे विद्यार्थी शाळेत येत नसल्याने अध्यापनावर परिणाम होत होता.  controversy-in-mp-over-school-order वर्गात उपस्थिती कमी राहिल्याने शिकवणीचे नुकसान होत होते. त्यामुळे आम्ही शुक्रवारी सुट्टी देण्याचा आणि रविवारी शाळा घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे व्यवहार्य असून, शिक्षण प्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी घेतला आहे.”
शाळा मुस्लिम बहुल भागात असल्यामुळे शुक्रवारी बहुतांश मुले नमाजसाठी शाळेत येऊ शकत नाहीत, म्हणूनच हे पाऊल उचलल्याचे व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण आहे. तथापि, या निर्णयामुळे पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक पालक म्हणतात की, रविवारी सुट्टी म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र येण्याचा एकमेव दिवस असतो. controversy-in-mp-over-school-order आता रविवारी शाळा चालू ठेवल्याने मुलांसोबत वेळ घालवणे कठीण होणार आहे. काहींनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला आहे की, “धार्मिक कारणांवर आधारित साप्ताहिक सुट्टी बदलण्याचा अधिकार एका खासगी शाळेला आहे का?”दरम्यान, शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणाले की, त्यांना या निर्णयाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर विभागाने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोणत्याही शाळेला आपल्या मनाने साप्ताहिक सुट्टी बदलण्याचा अधिकार नाही.