हरमनप्रीत कौरचा भावनिक प्रतिसाद: “शब्द नाहीत…”

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नवी मुंबई,
IND vs AUS : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेटने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने ३३९ धावांचे अवघड लक्ष्य पार करून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाने ऑस्ट्रेलियाच्या २०१७ नंतरच्या विजयी मालिकेलाही पूर्णविराम मिळाला.
 
 
 
KOUR
 
 
 
विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर भावूक झाली. तिने सांगितले, “हा आनंद शब्दात सांगता येणार नाही. संघाने जे साध्य केले आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. आम्ही वर्षानुवर्षे यासाठी मेहनत घेतली आहे. प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका उत्कृष्टरीत्या निभावली.”
 
 
हरमनप्रीत पुढे म्हणाली, “शेवटची पाच षटके नेहमीच निर्णायक ठरतात. आम्ही शांतपणे आणि विचारपूर्वक खेळलो. जेमिमाने अप्रतिम फलंदाजी केली. ती नेहमी लक्ष केंद्रित ठेवते आणि संघासाठी खेळते. तिच्यासोबत फलंदाजी करणे आनंददायी असते.” ती म्हणाली, “आता एकच सामना शिल्लक आहे आणि आमचे लक्ष फक्त विश्वचषक जिंकण्यावर आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणे ही आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. आम्ही चाहत्यांसाठी हा किताब जिंकू इच्छितो.”